Tuesday, August 28, 2007

दोष निसर्गाचाच?!

मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ शकेल. गेली दोन वर्षे पावसाने महाराष्ट्राला चांगली साथ दिली आहे. दरवर्षी धरणे चांगली भरली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य फारसे कोठेही जाणवले नाही. यंदाही पाऊस-पाणी समाधानकारकच आहे; परंतु ऑगस्ट महिन्यातील उघडीप लांबली. विशेषतः मराठवाड्यातील सर्व जिल्हे कोरेड ठणठणीत झाले. त्यामुळे चिंताजनक वातावरण होते. पाऊस असाच चालू राहिला, तर हे वातावरण दूर होऊ शकेल.
दहा टक्के दराने विकास साधणारा आणि महासत्तेची स्वप्ने पाहणारा भारत आजच्या एकविसाव्या शतकातही पावसावर म्हणजेच निसर्गावर किती अवलंबून आहे, याचे हे ठळक उदाहरण. पावसाने जोर ओढ दिली, की आमच्या काळजाचे ठोके चुकतात. पावसाने अंशतः पाठ फिरविली, तरी आमचे शेतीउत्पादन कमी होते आणि विकासाचा दरही खाली येतो! याउलट पावसाचा जोर वाढला, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई जलमय होते. अनेक ठिकाणी पूर, महापूर येतात आणि वाताहात होते. अन्‌ "पाऊस नको,' असे आम्ही म्हणू लागतो. थोडक्‍यात, आम्हाला अवर्षण आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटांचा सामनाच करता येत नाही. पाऊस कसा नेमाने, इमानेइतबारे "कमीही नाही अन्‌ जास्तही नाही,' अशा प्रकारे पडावा, अशी आमची अपेक्षा असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही आम्ही दुष्काळात तग धरू शकत नाही आणि महापूर रोखू शकत नाही.
जगात असे अनेक देश आहेत, की जिथे निसर्ग प्रतिकूल आहे. त्या स्थितीतही निसर्गावर मात करीत अशा देशांनी प्रगती साध्य केली आहे. जपान, इस्राईल अशा अनेक देशांची यादी उदाहरण म्हणून देता येईल. जपान हा चिमुकला देश. अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने त्याला बेचिराख केले. निसर्गही वेळोवेळी रौद्ररूप धारण करायचा. भूकंप, त्सूनामी नित्याचेच. या साऱ्यांवर मात करीत जपान जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. इस्राईलला ना निसर्ग अनुकूल आहे, ना भोवतालची परिस्थिती. एकीकळे वाळवंट, तर दुसरीकडे नित्याचा बनलेला रक्तरंजित संघर्ष. तरीही या देशाने नंदनवन फुलविले आहे. भारताला सुदैवाने संपन्न असा निसर्ग लाभला आहे. जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो म्हणजे पडतोच. अगदी "कोरडा दुष्काळ' म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या काळातही किमान 70 टक्के पाऊस होतोच. आपल्या दैनंदिन आयुष्यात क्वचितच समयसूचकता पाळणारे आपण सारे, मॉन्सून एक जूनला म्हणजे एक जूनला केरळ किनारपट्टीवर येऊन थडकावा, अशी अपेक्षा धरून असतो. विशेष म्हणजे बहुतेक वेळा या अपेक्षेची पूर्ती होतच असते. तरीही आपण अनेकदा मॉन्सूनच्या नावाने खडे फोडत असतो. पाऊस चांगला झाला, की आमची शेती चांगली होते आणि विकासाचा दरही चढा राहतो. पावसाने दगा दिला, की यांपैकी काहीही होत नाही. ही स्थिती आम्ही कधी बदलणार आहोत? जो काही पाऊस होतो, तो साठवून ठेवण्याचा व्यापक प्रयत्न का करीत नाही? शेतीला पुरेल इतके पाणी साठविणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे इतके का अशक्‍य आहे? जरा पाऊस जास्त झाला, की पूर येतो आणि वाताहात होते. आपले पूरव्यवस्थापन इतक्‍या प्राथमिक अवस्थेत का आहे? पाण्याचा निचरा होण्याची चांगली व्यवस्था आमच्या शहरांमध्ये का नाही?
खरे तर या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला माहीत आहेत. पाणी साठविण्याचे प्रयत्न होतच नाहीत, असे नाही. पण, ते प्रयोगांपुरतेच मर्यादित आहेत. अशा प्रकारचे प्रयोग राबविणारे बेटे देशभर तयार झाली आहेत. या प्रयोगांचे सार्वत्रिकीकरण झालेले नाही. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय ते होणारही नाही. उठसूठ शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या भल्याच्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांना यामध्ये रस नाही. त्याच्या ऐवजी दुष्काळाच्या (वा अतिवृष्टीच्या) नावाने टाहो फोडून कित्येक शे कोटी रुपयांचे पॅकेजेस पदरात पाडून घेण्यात त्यांना रस आहे. नदीच्या पात्रातील अतिक्रमणे सहजपणे दिसत असतात. एरवी त्याच्याकडे काणाडोळा केला जातो आणि पूर आल्यानंतर ही अतिक्रमणे कशी झाली याच्या चौकशीचे नाटक वठविले जाते. पुण्यासारख्या शहरात तर नदीला नाला ठरविण्याचा खटाटोपही केला जातो. भ्रष्टाचाराची भली मोठी साखळी या मागे असते.
"पावसाळा म्हटला, की एखाद-दुसरी मोठी सर येणारच आणि पूरही येणारच. कोठे तरी भिंत किंवा इमारत पडणारच आणि त्यात काही जण दगावणारच. त्यामुळे यात बाऊ करण्यासारखे काही नाही,' असेच बहुतेकांना वाटत राहते. त्यामुळे कोणतीही सकारात्मक कृती आम्ही करीत नाही. प्रश्‍न कायमचा सोडविण्याऐवजी तो लांबविण्यावरच आम्हाला सोय वाटत असते. आमची ही वृत्तीच आम्हाला निसर्गावर अवलंबून राहायला लावते. पण, एक बरे आहे कितीही दोषारोप केला, तरी निसर्ग काही उत्तर द्यायला येत नाही. त्याच्या चक्रात किती मानवी हस्तक्षेप झाला आहे आणि त्याचा गळा कसा घोटला जात आहे, हे तो सांगत नाही. फक्त अती झाले, की तो रुद्रावतार घेतो आणि मग आम्ही परत त्यालाच दोष देऊ लागतो.
हे असेच चालत राहणार आणि तरीही आम्ही महासत्ता होणार!

1 comment:

Anonymous said...

India has not developed proper ifrastructure for rainwater harvesting. So is the case for encroachment in riverbed. However nature is also changing. This because of manmade disaster called "global warming" which you've not mentioned.