Friday, August 3, 2007

विवेकहीन माध्यमे

लहानपणी एका बहुरुप्याची गोष्ट वाचली होती. हा बहुरुपी एका छोटेखानी गावात साधूच्या रुपात जातो. तेथील एका देवळात मुक्काम ठोकतो. गावातल्या लोकांना याची कुणकूण लागते. मग साधूमहाराजांच्या दर्शनासाठी लोक जमू लागतात. साधूही रोज रात्री प्रवचन देऊ लागतात, ""हे जग म्हणजे माया आहे. या मायाजालात अडकू नका. त्यामुळे मोक्षप्राप्ती होणार नाही.'' साधूंच्या अमोघवाणीचा प्रभाव ग्रामस्थांवर पडतो. त्या गावात एक गर्भश्रीमंतही असतो. त्याच्याही कानावर साधूंची महती पडते. तोही साधूंचे प्रवचन ऐकतो आणि त्याचे मनपरिवर्तन होते. आयुष्यभर जमवलेल्या संपत्तीचा मोह सुटतो. एका रात्री ते साधूमहाराजांकडे येतात आणि ही सारी संपत्ती त्यांना देऊ करतात. साधू म्हणतात, ""या मायेपासून मुक्त होण्यासाठी तर मी धडपडत आहे. मला कसलीही आसक्ती नाही. तुला संपत्ती नको असेल, तर दानधर्म कर; पण मला देऊ नको.'' श्रीमंत माणसाची कशीबशी समजूत निघते आणि तो घरी परत जातो. दुसऱ्या दिवशी साधूमहाराज गावातून गायब झालेले असतात. त्या दिवशी सायंकाळी एक गृहस्थ श्रीमंत माणसाकडे येतो अन्‌ बक्षिसी मागू लागतो. ""कसली बक्षिसी?'' श्रीमंत माणूस विचारतो. त्यावर तो गृहस्थ म्हणतो, ""मी एक बहुरुपी आहे. गेला महिनाभर साधूचे रूप घेऊन या गावात राहिलो. रूप छान वठले की नाही? त्याची बक्षिसी द्या.'' श्रीमंत माणून आवाक होतो. म्हणतो, ""काल रात्री माझी सारी संपत्ती घेऊन तुझ्याकडे आलो होतो. ती घेतली असती तर कोणाला शंकाही आली नसती. आज मात्र किरकोळ बक्षिसी मागतोस?'' त्यावर बहुरुपी म्हणतो, ""महाराज, मी बहुरुपी आहे, सच्चा कलाकार आहे. काल साधूच्या रुपात होतो. तुम्ही जी संपत्ती देऊ करत होता, ती त्या साधूला, मला नव्हे. मी जर ते पैसे घेतले असते, तर माझे रूप व्यवस्थित वठले नसते. एक बहुरुपी म्हणून मी कमी पडलो असतो.''
----
अभिनेता संजय दत्त याला सक्तमजुरीची शिक्षा झाल्यानंतर विशेषतः प्रसारमाध्यमांमध्ये ज्या प्रकारचे चित्रीकरण होत आहे, ते पाहताना बहुरुप्याची ही गोष्ट आठवली. 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या आधी संजय दत्तने बेकायदा शस्त्र बाळगले होते. त्याचा हा गुन्हा सिद्ध झाला आणि त्यानुसार त्याला शिक्षाही झाली. त्याच्या प्रमाणेच अनेकांना शिक्षा झाली आहे. काही जणांना तर फाशीची सजाही ठोठावण्यात आली आहे. तरीही संजय दत्तवर फार मोठा अन्याय झाल्याचे आकांडतांडव माध्यमे करू लागली आहेत. (केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी आणि कपिल सिब्बल हेही त्या सुरात सूर मिसळत आहेत.) संजय दत्तचा "लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपट गेल्यावर्षी विलक्षण यशस्वी ठरला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या एका माजी गुंडाची भूमिका त्याने त्यात केली आहे. त्याने वापरलेला "गांधीगिरी' हा शब्द आज सर्वमान्य झाला आहे. संजयला शिक्षा जाहीर झाल्यानंतर "लगे रहो'मधील त्याची भूमिका आणि गांधीगिरी यांना उजाळा दिला जात आहे. गांधीजींच्या विचारांनी त्याच्यात किती बदल झाला आहे याची उजळणी केली जात आहे. संजय दत्त हा एक कलाकार आहे. जी एक भूमिका वाट्याला येईल ती तन्मयतेने साकार करायची हा कलाकाराचा गुणधर्म आहे. भूमिका करीत असतो तोपर्यंत कलाकार ती भूमिका जगत असतो. एकदा का ती भूमिका संपली, की तो त्याचा अन्‌ त्या भूमिकेचा काहीही संबंध नसतो. तो असणेही धोकादायक ठरले असते. तसे असते तर पडद्यावरील सारे खलनायक आयुष्यभरही खलनायक म्हणून वावरले असते. "लगे रहो'मुळे संजय दत्तला गांधीजी समजलेही असतील कदाचित; पण त्यामुळे त्याने तेरा वर्षांपूर्वी केलेला गुन्हा माफ करता येत नाही. न्यायव्यवस्था ही व्यक्तिनिरपेक्ष असते. ती तशी असावी म्हणूनच न्यायदेवता आंधळी असते. संजय कलाकार आणि "सेलिब्रेटी' आहे म्हणून त्याला सौम्य शिक्षा मिळावी किंवा त्याला सोडून द्यावे, असे म्हणणे म्हणजे आम्हाला सोईस्कर असे "न्यायाचे राज्य' हवे असे म्हटल्यासारखे आहे. प्रसारमाध्यमांनी तरी किमान हे भान ठेवायला हवे.
पण, माध्यमांना- विशेषतः -दूरचित्रवाणी वाहिन्यांना हे भान येणे अवघड आहे. कारण या वाहिन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतविण्यात आला आहे. त्याचा परतावा मिळवायचा असेल, तर "टीआरपी' वाढवावा वागेल आणि त्यासाठी सनसनाटी बातमीदारी आणि "सेलिब्रेटी पत्रकारिता' यांखेरीज पर्याय नाही, असे त्यांना वाटते. बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे असे असते. एकदा का सारे काही त्यावर सोडून दिले, की सद्‌सद्विवेकबुद्धीही गहाण ठेवावी लागते. दूरचित्रवाणी वाहिन्यांचेही नेमके हेच झाले आहे. अशी विवेकहीन माध्यमे असणे सामाजिक अनारोग्याचे लक्षण आहे.

5 comments:

Abhijit Thite said...

dear anya (ki ani?)

khup chan lihila aahes tu. agadi yogya mudda mandlas. sanjay datta ha aata gunhegar aahe. tyala evadhi prasidhi kashasathi? kal saglya channal var pinjaryatla sanjay aani mage mage lubrya sarkhe firnare channal valle, ase chitra hote. bar lokannahi hech have, he te kashavarun tharavtat? he thambale pahije

HAREKRISHNAJI said...

किती चपखल व योग्य लिहीले आहेत. हे कोणीतरी लिहिण्याची गरज होती. प्रसिद्धीमाधमांनी तर तारतंत्रच सोडले आहे. सारा पैशाचा खेळ.आपण कशाचे उदात्तीकरण करतो आहे याचे ही त्यांना भान नाही.

आता त्याच्याबद्द्ल सहानभुती मिळवण्यासाठी लेख लिहीणे, अश्याच गुन्हातील ईतरजण दोषी असताना ही कसे मोकळे सुटले हे सांगणॆ वगैरे चालु होईल.

यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आपण लिहील्या प्रमाणॆ राजकीय नेते ही त्याची भलावण करु लागले आहेत.

हा चित्रपट व ही भुमिका हे सुद्धा त्याचे एक चांगला भला माणुस म्हणुन लोकांपुढे प्रतिमा निर्माण करणॆ याच उद्देशाने काढला असावा.

भुमीका व खरे आयुष्य आतली सीमारेषा फार कमी जणांनाच कळली.

Unknown said...

खरं सांगायचं तर काल येरवडा तुरंगाबाहेर जे काही घडले तो पुणेकरांकडून मुंबईकरांचा घोर अपमान होता. संजय दत्तला मुंबईत शिक्षा सुनावल्यानंतर तिथे घोषणाबाजी झाली नाही. पुण्यात ती झाली. 1993 च्या बाँबस्फोटात मरण पावलेल्या मुंबईकरांचा हा अपमान आहे. प्रसारमाध्यमांना भान नाही हे खरेच! पण शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातही ते भान हरपलेले असावे याचे वाईट वाटते.

sunilSchavan said...

Yes Amit you are right. Pune tithe kay une" Ase mahnantat te badlun pune tithe Tartamya une ase mahana...

Anonymous said...

media bharkatat chalalay, karan tyavar prekshak aani vachak yancha ankushach nahi. Prekshkanna have aahe ase sangat aaplyala vattel te TV wale dakhvat astat.