Sunday, July 6, 2008

नापासाचा शिक्का पुसला; पण...

सा त-आठ वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण चाळीस ते पन्नास टक्‍क्‍यांच्या घरात घुटमळत असे, तेव्हा एक प्रश्‍न हमखास उपस्थित केला जायचा। तो म्हणजे, "एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण का होतात? त्यांच्यावरील नापासाचा शिक्का पुसता येणार नाही का?' आणि आता दहावीच्या परीक्षेत प्रथमच जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तेव्हा त्याचे मनापासून स्वागत न करता, "निकाल इतका जास्त कसा काय लागला,' असा प्रश्‍न विचारला जात आहे. अनेक जण या प्रश्‍नाच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहेत आणि गुणवत्ता खालावत असल्याबद्दल चिंताही व्यक्त करीत आहेत. दहावीच्या परीक्षेचा आणि गुणवत्तेचा काही संबंध नाही, अशी शेरेबाजीही काही "सिनिक' मंडळी करीत आहेत. नापासांची संख्या अधिक असताना त्यांच्या भवितव्याबद्दल प्रश्‍न उपस्थित केल्या जाणाऱ्या आपल्या समाजात आता पासांची संख्या वाढल्यावर, शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा निष्कर्ष घाईघाईने का काढला जात आहे? निकालाची चिकित्सा करण्याची मागणी का केली जात आहे?

वास्तविक यंदाच्या दहावीच्या निकालाने काही विक्रम प्रस्थापित केले आहेत। उत्तीर्णांची संख्या ऐंशी टक्‍क्‍यांच्या घरात नेऊन "पास-नापास'च्या उंबरठ्यावर असणाऱ्या अनेकांना या निकालाने आधार दिला आहे. दहावीच्या परीक्षेत एकदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर ज्यांचे शिक्षण कदाचित थांबले असते, त्यांना ते पुढे चालू ठेवण्याची संधी या निकालाने दिली आहे. इंग्रजी, गणित यांसारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या विषयांतच ज्यांची दांडी उडते, अशांना अन्य विषयांच्या मदतीने शिक्षणाचा एक टप्पा पार करण्यास या निकालाने मदत केली आहे. उत्तीर्णांची टक्केवारी वाढल्याचे कारण शोधणे फार अवघड नाही. इंग्रजी, हिंदी, मराठी आदींसारख्या भाषा विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येकी 35 गुण (शंभरपैकी) मिळणे आवश्‍यक असते. हा नियम यंदापासून बदलण्यात आला. या तिन्ही विषयांना मिळून 105 गुण (तीनशेपैकी) मिळाले असल्यास आणि प्रत्येक विषयाला किमान 25 गुण असल्यास विद्यार्थी त्यांमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. गणित आणि विज्ञानाच्या बाबतीतही असाच नियम करण्यात आला आहे. एरवी गणित आणि इंग्रजीत अनुत्तीर्ण होऊ शकणारे विद्यार्थी या नव्या नियमांमुळे उत्तीर्ण झाले. म्हणूनच या दोन्ही विषयांतील उत्तीर्णांची टक्केवारी 89 टक्‍क्‍यांच्या घरात गेली आहे. यंदापासून शाळांतर्गत मूल्यांकन पद्धतही सुरू झाली आहे. भाषा विषयांसाठी वीस गुणांची तोंडी परीक्षा आणि गणितासाठीही तीस गुणांचे अंतर्गत मूल्यमापन ठेवण्यात आले. अंतर्गत परीक्षांमध्येही वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अपेक्षित असले, तरी बहुतेक शाळा सढळहस्ते गुण देतात. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच झाला असणार.

गुणदान पद्धतीतील या नव्या नियमांमुळे निकाल चांगला लागला। पुढील वर्षापासून तो आणखी चांगला लागू शकेल; कारण नववी आणि दहावी या इयत्तांना गणित हा विषय "हायर' आणि "लोअर' अशा दोन स्तरांवर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नेहमीचे गणित ज्यांना अवघड जाते, असे विद्यार्थी तुलनेने सोपे असलेले "लोअर' गणित घेऊ शकतात. परिणामी, गणितातील उत्तीर्णांची टक्केवारी आणखी वाढेल.दहावीमधील अनुत्तीर्णांची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुरू केलेले उपक्रम हे निश्‍चितच चांगले आहेत. त्यांचे स्वागतच करायला हवे. दहावीचा बागुलबुवा दूर करण्याच्या या प्रयत्नामुळे दहावीचा एक नवा "पॅटर्न' तयार झाला आहे. उत्तीर्णांची संख्या वाढल्याने गुणवत्ता वाढली, असे कोणालाही म्हणता येणार नाही; पण ती कमी झाली असेही म्हणता येणार नाही. या दोहोंपैकी कोणत्याही निष्कर्षावर चटकन येता येणार नाही; मात्र शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा, काही शैक्षणिक प्रयोग करण्याचा आणि गुणवत्ता उंचावण्याचा हा जर प्रयत्न असेल, तर तो अपुरा आहे, हे नक्की म्हणता येईल. या प्रयत्नांना जोड हवी आहे, ती कौशल्ये विकसित करणाऱ्या शिक्षणाची, उच्च शिक्षणाचा प्रसार वाढविण्याची, त्याच्या विकेंद्रीकरणाची आणि या साऱ्या बाबी लक्षात घेऊन सर्वंकष धोरण आखण्याची. यांपैकी काहीही एक न करता फक्त दहावीतील उत्तीर्णांची संख्या वाढवत नेल्यास ना शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होणार, ना दर्जा उंचावणार.

दहावीची परीक्षा ही एक सार्वत्रिक (मास) परीक्षा असते. महाराष्ट्रासारख्या राज्यात पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. मुंबई-पुणे या शहरांतील सुस्थित घरांतील सर्व सुविधांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच नानाविध सुविधा ज्यांच्यापर्यंत पोचलेल्याच नाहीत, अशा दुर्गम भागातील विद्यार्थीही ही परीक्षा देत असतात। सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्तापातळी सारखी नसतेच; तसेच त्यांची कौटुंबिक-सामाजिक-आर्थिक स्थितीही सारखी नसते, तरीही एकाच परीक्षेद्वारे त्यांच्या गुणवत्तेचे मोजमाप केले जाते. त्यामुळे या परीक्षेची काठीण्यपातळी फार वरची असून चालत नाही. हे भान ठेवूनच आपल्याकडे ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या उपाययोजनांमुळे ही परीक्षा अधिक सर्वसमावेशक होऊ शकेल; मात्र आता गरज आहे, ती पुढची पावले उचलण्याची.पहिले पाऊल असावे ती गुणवत्तावाढीचे. दहावी उत्तीर्ण होणे सोपेच असावे; परंतु चांगले गुण मिळविणे अवघड असावे. म्हणजे असे, की उत्तीर्ण होण्याची पातळी ओलांडल्यानंतर हळूहळू काठीण्यपातळी उंचावली जावी आणि 80 टक्‍क्‍यांच्या पुढे गुण मिळविणाऱ्यांसाठी ती अधिक वरची असावी. तेथे विद्यार्थ्यांचा बौद्धिक कस लागायला हवा. त्यांना विचार करण्यास, तर्कसंगती लावण्यास प्रवृत्त केले जावे. यामुळे शिक्षकही अधिक विचार करू लागतील. त्याचा लाभ साऱ्याच विद्यार्थ्यांना होईल आणि गुणवत्तावाढीच्या दिशेने जाता येईल. सार्वत्रिकीकरणावर भर देताना गुणवत्तेशी कळत-नकळत जी तडजोड केली जाते, त्याची भरपाई यामुळे काही प्रमाणात होईल.

दुसरे पाऊल असावे, ते पूरक शिक्षण देण्याचे। काळाची आणि विविध उद्योगांची गरज ओळखून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करू शकतील, असे अभ्यासक्रम तयार करण्याचे. सध्या आपल्याकडे अकरावी-बारावीला किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) आहे; परंतु त्याची मोठ्या प्रमाणावर उपेक्षा होत आहे. या अभ्यासक्रमाला "ग्लॅमर'ही नाही. वास्तविक या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवायला हवी. उपयोजित कलांपासून नवतंत्रज्ञानापर्यंतच्या सर्व क्षेत्रांसाठी- ज्यामध्ये विशिष्ट कौशल्यांची गरज असते- अभ्यासक्रम विकसित करायला हवा. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे जाऊ शकतील.कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आणि तुकड्या वाढविणेही गरजेचे आहे. बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी असल्याने राज्य सरकारने तातडीने कृती करायला हवी. दहावीचा निकाल दर वर्षी वाढत जाणार हे ओळखून नवे वर्ग आणि नवी महाविद्यालये (अनुदान तत्त्वावर) सुरू करायला हवीत. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार सर्व शिक्षण योजना जोमाने राबवीत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन शाळांमधील गळती थांबली, तर विद्यार्थिसंख्या वाढत जाणार. दहावीनंतर या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणही सहजपणे उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठीच्या पायाभूत सुविधा वाढवायला हव्यात. देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण जेमतेम दहा टक्के आहे. हे प्रमाण पंधरा टक्‍क्‍यांवर नेण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय ज्ञान आयोगाने ठेवले आहे. त्याची पूर्तता करायची असेल, तर महाविद्यालयांची, विद्यापीठांची संख्या वाढविणे आवश्‍यक आहे. म्हणजेच उच्च शिक्षणावरील खर्च वाढवायला हवा. त्यासाठी सरकारने खासगी क्षेत्राची मदत जरूर घ्यावी; पण सारे काही खासगी क्षेत्राच्या खांद्यावर सोपवून अंग काढून घेण्याचे धोरण अवलंबू नये.

संख्यात्मकता (क्वांटिटी) आणि गुणात्मकता (क्वालिटी) यांचे प्रमाण व्यस्त असते, असे म्हणतात. म्हणजे संख्या वाढली, की गुणवत्ता घटते, असे मानले जाते. शिक्षणाच्या बाबतीत हा समज खोटा ठरवायचा असेल, तर परीक्षा मंडळ, सरकार, खासगी शिक्षणसंस्था आणि शिक्षणक्षेत्रातील धुरीण या साऱ्यांनी एकत्र येऊन पावले उचलणे गरजेचे आहे, तरच शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरण होऊ शकेल आणि काही प्रमाणात गुणवत्ताही उंचावू शकेल. यंदाच्या दहावीच्या निकालाचा हाच खरा बोध आहे.

Tuesday, May 27, 2008

"आयकॉन'ची मांदियाळी


भारत बदलतोय। माहिती तंत्रज्ञान क्रांती, जागतिकीकरण, खासगीकरण, सेवा उद्योगांचे वाढते वर्चस्व यांमुळे भारतातील मध्यमवर्ग बदलतो तर आहेच; पण त्याचा विस्तारही होत आहे. मल्टिप्लेक्‍स, मॉल्स, मोबाईल फोनधारकांची 25 कोटींच्या वर गेलेली संख्या, मोटारींचे नवनवे ब्रॅंड्‌स, दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये दिवसागणिक पडणारी भर, यांमुळे केवळ चार- सहा महानगरांचाच नव्हे, तर मध्यम आणि छोट्या शहरांचाही चेहरा- मोहरा बदलत आहे. भौतिक साधनांची रेलचेल वाढते आहे. नवनव्या संधींमुळे म्हणा किंवा सुबत्तेमुळे म्हणा मध्यमवर्गीयांच्या संकल्पनाही बदलत आहेत. गरजेपेक्षा अधिक पैसे मिळविणे म्हणजे जणू काही पाप करणे, असे या वर्गाला एकेकाळी वाटत असे. मात्र, त्याचा हा समज आता दूर होत आहे. त्यामुळे करिअरच्या नवनव्या क्षेत्रांत तो आता सहजगत्या वावरत आहे. या साऱ्यांमुळे त्याची जीवनविषयक मूल्ये आणि श्रद्धास्थानेही (आयकॉन्सही) बदलत आहेत.

वास्तविक भारतासारख्या देशात जनसमुदायाच्या श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तींची संख्या काही कमी नाही। धर्म, समाजसुधारणा, स्वातंत्र्यचळवळ, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट आदी विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आपल्याकडून होऊन गेली. काहींना तर लोकांनी चक्क देवपण बहाल केले, तर काही जण जिवंतपणीच दंतकथा बनून राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वाभाविकच स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांचा मोठा पगडा समाजावर होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर आदींसारख्या मातब्बर नेत्यांनी त्या काळात लोकमानसावर राज्य केले. एक आदर्श म्हणून, प्रेरणास्रोत म्हणून लोक त्यांच्याकडे बघत. कोणी त्यांचा आदर्शवाद जपत, तर कोणी त्यांचा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील आदर्शवाद नंतर हळूहळू लोप पावत गेला, तरी आदर्शवाद्यांची एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे। "साधी राहणी- उच्च विचारसरणी,' हा शब्दप्रयोग या आदर्शवादानेच रूढ केला आहे. भौतिक सुखाकडे पाठ फिरवत विचारांची बांधिलकी मानून समाजकार्य करणाऱ्यांचीही परंपरा आपल्याकडे आहे. साठ आणि सत्तरच्या दशकांत मध्यमवर्गीयांना आकर्षण होते, ते अशा आदर्शांचे. साने गुरुजी आणि त्यांची धडपडणारी मुले हे या आदर्शवादाचे एक प्रतीक म्हणता येईल. 1971 च्या बांगलादेश युद्धानंतर, सामान्य माणूस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना "दुर्गामाते'च्या रूपात पाहत होता; परंतु परिस्थितीनेच असे काही वळण घेतले, की आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी चक्क "व्हिलन' ठरल्या आणि जयप्रकाश नारायण "हीरो'. पुढे जनता पक्षाच्या सरकारने भ्रमनिरास केल्याने मध्यमवर्गीय राजकारणापासून दूर होत गेला.

केवळ राजकारण किंवा आदर्शवादाचेच आकर्षण समाजाला नव्हते। साहित्य, कला, चित्रपट आणि क्रिकेट या क्षेत्रांतील दिग्गजही त्यांना खुणावू लागले होते. साऱ्या देशवासीयांच्या गळ्यातील ताईत बनण्याचे भाग्य मात्र चित्रपट आणि क्रिकेटमधील "ताऱ्यां'नाच लाभले. साठच्या दशकात भारतीय चित्रपटही वयात येऊ लागले. चित्रपटांतील कलावंत आणि गायक मंडळी रसिकांच्या हृदयावर राज्य करू लागली. म्हणूनच तर दिलीपकुमार, राजकपूर आणि देव आनंद या त्रयींना "स्टार'पण लाभले आणि लता मंगेशकर गानकोकिळा बनल्या. पुढे भावुक आणि स्वप्नाळू चेहऱ्याचा राजेश खन्ना चक्क "सुपरस्टार' बनला. सत्तरचे दशक संघर्षाचे होते. लोक रस्त्यावर उतरत होते. व्यवस्थेबद्दलची चीड लोकांमध्ये निर्माण झाली. या व्यवस्थेविरुद्ध रुपेरी पडद्यावर पेटून उटणाऱ्या अमिताभ बच्चनमध्ये लोक स्वतःला पाहू लागले आणि पाहता- पाहता हा "अँग्री यंग मॅन' "सुपरस्टार' झाला.

नव्वदचे दशक भारताला कलाटणी देणारे ठरले। वास्तविक त्याची नांदी ऐंशीच्या उत्तरार्धातच झाली होती। इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. भारताला एकविसाव्या शतकाचे स्वप्न पाहण्यास त्यांनी शिकविले. आधुनिकीकरणाची, संगणकीकरणाची त्यांनी केवळ भाषाच वापरली नाही, तर कृतीही केली. याच काळात सोव्हिएत साम्राज्य कोसळले, बर्लिनची भिंत पडली आणि पूर्व युरोपातील साम्यवादही संपुष्टात आला. जग एकध्रुवीय बनत गेले आणि जागतिकीकरणाची लाट आली. माहिती तंत्रज्ञानाने ही लाट शक्तिशाली केली आणि मध्यमवर्गीयांसाठी संधीची अनेक दालने खुली झाली. नव्वदच्या दशकाने केवळ माहिती तंत्रज्ञानच नव्हे, तर दूरसंचार, प्रसार माध्यमे, करमणूक, सेवा उद्योग, जैवतंत्रज्ञान आदी अनेक क्षेत्रांत क्रांती घडवून आणली.

साठच्या दशकातील आदर्शवाद, सत्तरच्या दशकातील संघर्ष मागे पडला। चित्रपट आणि क्रिकेटमधील तारकांबरोबरच नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करणारे, जागतिक प्रस्थापितांना धक्का देणारे, नवा आशय मांडणारे देखील सर्वसामान्यांना खुणावू लागले. अमिताभची जागा शाहरूख खानने घेतली आणि गावसकरची जागा सचिन तेंडुलकरने; पण यांच्या जोडीनेच नारायणमूर्ती, अझिम प्रेमजी हेही "आयकॉन'च्या रांगेत जाऊन बसले. रतन टाटांबद्दलचा आदरही वाढत गेला. प्रथम माधुरी दीक्षित आणि नंतर ऐश्‍वर्या राय या अभिनेत्रीही "आयकॉन'पदापर्यंत पोचल्या.

राजकारण्यांची विश्‍वासार्हता कमी होण्याच्या या काळात अन्य क्षेत्रातील व्यक्तींचे कर्तृत्व अधिक उंच वाटू लागले। विशेषतः "मिसाईल मॅन' डॉ. अब्दुल कलाम यांच्या सारख्या शास्त्रज्ञांचे. लहान मुलांशी सहजपणे संवाद साधण्याची त्यांची हातोटी इतकी विलक्षण, की त्यामुळे ते "कलाम चाचा' कधी बनले हे समजलेच नाही. त्यामुळे "आयकॉन' बनलेले कलाम नंतर राष्ट्रपती बनले. छोट्या पडद्यावरील कलावंतांची लोकप्रियताही याच काळात वाढत गेली. त्यामुळे प्रणव रॉय, स्मृती इराणी, शेखर सुमन ही मंडळीही "स्टार'पदाला जाऊन पोचली. राजकारण्यांची लोकप्रियता आटत असली, तरी अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यादव यांची एक वेगळी प्रतिमा देशभर झाली.

एकविसावे शतक सुरू झाले आणि मध्यम व छोट्या शहरवासीयांच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटले। माहिती आणि दूरसंचार क्रांतीमुळे साऱ्या जगातील घटना-घडामोडी आणि "ट्रेंड्‌स' छोट्या-छोट्या वेळेत ठिकाणाही पोचू लागल्या. त्यामुळे "एक्‍स्पोजर' वाढत गेले. त्याचा परिणाम म्हणजे छोट्या ठिकाणांहून किंवा प्रतिकूल परिस्थितीतून आलेले युवक- युवती चमकदार कामगिरी करू लागले. महेंद्रसिंह धोनी हे त्याचे ठळक उदाहरण. रांचीसारख्या ठिकाणच्या धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये एक नवी आक्रमकता आणली आहे. त्यामुळेच सध्याच्या "आयपीएल'मध्ये सर्वाधिक बोली त्याच्यावर लागली; पण धोनी हे काही एकमेव उदाहरण नाही. प्रवीणकुमार, इशांत शर्मा यांसारखी अनेक नावे घेता येतील. क्रिकेटमध्येच नव्हे, तर चित्रपट, दूरचित्रवाणी, उद्योग आदी अन्य क्षेत्रांतही हेच घडत आहे. दूरचित्रवाणीवरील "टॅलेंट हंट' कार्यक्रम याची प्रचिती देतात. म्हणूनच नवनवीन "आयकॉन्स' निर्माण होत आहेत.

"साधी राहणी, उच्च विचारसरणी' या आदर्शवादाचा उल्लेख आज होत नसला, तरी आदर्शांबद्दलचे समाजाचे आकर्षण कायम आहे। फक्त "आदर्श कोण,' हा प्रश्‍न सापेक्ष बनला आहे. म्हणूनच "आयकॉन'ची मांदियाळी आज दिसते आहे. बदलत्या भारताचे, बदलत्या जीवनशैलीचे हेही एक निदर्शक आहे.

श्रीधर लोणी

Friday, May 16, 2008

मल्ल्या यांचा त्रागा


मल्ल्या यांचा त्रागा

कोर्पोरेट संस्कृतीचा एक साधे तत्त्व असते ः जितका पैसा खर्च करू त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक परतावा मिळायला हवा. हा परतावा म्हणजेच नफा मिळत जाणे म्हणजेच यशस्वी होणे. अशा प्रकारे यशस्वी झालेला उद्योजक मग (नफा मिळू शकेल अशा) नवनवीन क्षेत्रांत पैसा गुंतवत जातो. त्यासाठी आधी "मार्केट'चा "सर्व्हे' करतो, गलेलठ्ठ पगार देऊन "सीईओ' नेमतो, मार्केटिंगसाठी अधिकारी नेमतो अन्‌ बाजारपेठ काबीज करू लागतो. अशा प्रकारे यशामागून यश मिळत गेले, की तो एक मोठा यशस्वी उद्योगपती होतो. मग त्याला "जाएंट' म्हणूनही संबोधले जाते. नफा आणि यश मिळविण्याची त्याची भूक हळूहळू वाढत जाते. छोटे अपयशही त्याला डाचू लागते. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचे नेमके हेच झाले आहे.

मद्य उद्योगात नाव कमावलेल्या मल्ल्या यांनी नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्याचे ठरविले आहे. हवाई वाहतूक क्षेत्रात तर ते स्थिरावले आहेतच. भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेला क्रिकेटकडे सध्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले जात आहे. देशातील सर्व स्तरांतील वर्गांना आकर्षित करणाऱ्या या खेळाला करमणुकीचे स्वरूप केव्हाच प्राप्त झाले आहे. या करमणुकीद्वारे आणखी-आणखी पैसा करण्याची युक्ती सध्या चालू असलेल्या "इंडियन प्रिमिअर लीग'द्वारे प्रत्यक्षात येत आहे. एकाच चालीत प्रसिद्धी आणि पैसा हे दोन्ही मिळवून देणाऱ्या या लीगमध्ये पैसा गुंतविण्याची संधी मल्ल्या यांच्यासारख्यांनी दवडली असती, तरच आश्‍चर्य. मुकेश अंबानी, शाहरूख खान, प्रीती झिंटा यांच्याप्रमाणेच त्यांनीही फ्रॅंचायझी घेतली आणि बेंगळूरुच्या संघाचे ते मालक बनले.

मार्केटिंगचे तंत्र वापरत त्यांनी आपल्या संघाला "रॉयल चॅलेंजर्स' हे नाव दिले. "आयकॉन' राहुल द्रवीड कर्णधार बनला. चारू शर्माला "सीईओ' बनविले. कोट्यवधी रुपये खर्च केले. आणखी पैसे द्यायची तयारी ठेवली. मार्केटिंगही जबरदस्त केले. कॅटरीन कैफ, रम्या या अभिनेत्रींनाही घेऊन आपल्या संघाचे "ग्लॅमर'ही वाढविले. थोडक्‍यात गुंतवणूक करताना कसलीही कसर ठेवली नाही.

आता त्यांना अपेक्षा होती, ती रिटर्न्सची- परताव्याची. हा परतावा म्हणजे बेंगळूरुच्या संघाने जिंकत जाणे. मल्ल्या यांच्या कॉर्पोरेट तत्त्वानुसार या अपेक्षेत गैर काहीच नाही; पण त्यांचा अपेक्षाभंग होत गेला. "रॉयल चॅलेंजर्स' एका मागून एक सामना हरत चालला आहे. गुणतक्‍त्यात तो तळाला पोचला आहे.

पाहिजे तेवढा पैसा दिला आहे- अजूनही देण्याची तयारी आहे, "सीईओ' नेमला आहे, मार्केटिंग केले आहे; आणि तरीही परतावा कसा मिळत नाही- आपला संघ जिंकत कसा नाही, असा प्रश्‍न मल्ल्या यांना पडला आहे. अशा प्रकारच्या अपयशाची सवय नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. कॉर्पोरेट जगताच्या नियमानुसार त्यांनी प्रथम "सीईओ'ची हाकालपट्टी केली- आता नंबर आहे, तो द्रवीडचा; पण तडकाफडकी तसे करता येत नसल्याने त्यांनी द्रवीडवर तोंडसुख घेतले आहे. द्रवीड आणि शर्मा यांनी आपली दिशाभूल केली- कसोटीचा वाटेल असा संघ "ट्‌वेंटी-ट्‌वेंटी'साठी निवडला, असा त्रागा ते करीत आहेत.

क्रिकेटमध्ये पैसा जरी असला, तरी त्याला उद्योगाचे स्वरूप आलेले नाही, हेच मल्ल्यांना बहुधा समजलेले नाही. क्रिकेट हा एक खेळ आहे. खेळाडू कितीही कर्तृत्वसंपन्न असले, त्यांच्या नावावर कितीही विक्रम असले, तरी प्रत्यक्ष खेळाच्या दिवशी ते कशी कामगिरी करतात यावरच निकाल अवलंबून असतो. आणि प्रत्येक दिवस सारखा नसतो. एखाद्या संघाला एखादा सामनाच नव्हे, तर संपूर्ण मालिकाच खराब जाते- आणि याला कोणताही संघ अपवाद नसतो.

प्रत्येक संघातील खेळाडू जिद्दीनेच मैदानात उतरत असतो, कोणालाही हरायचे नसते. उद्योगांमध्ये, वाटाघाटींमध्ये "विन-विन' असा एक प्रकार असतो. म्हणजे एकाच वेळी दोन्हीही बाजूंचा विजय होतो. खेळांमध्ये अशी "विन-विन' स्थिती नसते. येथे कोणीतरी एकच जण जिंकतो आणि कोणाला तरी हरावेच लागते. मैदानावरील खेळ, जिद्द, जिगर, "किलिंग इन्स्टिंक्‍ट' हे सारे गुण दाखवूनही, तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल, तर अनेकांच्या पदरी पराभव येतो.

खेळामध्ये विजयाने मनोबल उंचावते, लय प्राप्त होते. यामुळे विजयाची एक मालिकाच निर्माण होऊ शकते. पराभवाने खच्चीकरण होते, लय बिघडते- त्यातून पराभवाची मालिका निर्माण होते. अशा वेळी पराभूत संघाला मनोबल उंचावणे गरजेचे असते. ते उंचावले तरच तो मैदानावर चांगली कामगिरी करू शकतो. मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्या मागे ठामपणे उभारणारे कोणीतरी हवे असतात. ""तुम्ही जिंकू शकता,'' असा विश्‍वास निर्माण करणारे कोणीतरी हवे असतात. एकदा का हा विश्‍वास वाढला, की मैदानावरील खेळ बहरू लागतो अन्‌ त्यातूनच विजय दृष्टिपथात येतो. द्रवीड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अशा प्रकारचा विश्‍वास हवा असताना मल्ल्या यांनी त्यांच्यावर अविश्‍वास दर्शविणारे विधान केले आहे. (त्यामुळे "रॉयल चॅलेंजर्स' पुन्हा एकदा हरले.)

कॉर्पोरेट क्षेत्रातील सारेच नियम खेळांना लागू होत नाहीत, हेच मल्ल्या यांना माहीत नसावे. क्रिकेटमध्ये पैसा खूप आला असला आणि संघ विकत घेण्याची पद्धत रुजत असली, तरी क्रिकेट म्हणजे "बिझनेस हाऊस' नाही, हेच खरे. उद्योग आणि क्रिकेट या दोहोंमधील फरक सर्वच नफेखोरांनी समजून घेतला पाहिजे.

श्रीधर लोणी

Monday, January 21, 2008

अभ्यास शिक्षक प्रशिक्षणाचा


"तारे जमीं पर'च्या निमित्ताने अध्ययनअक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दलची चर्चा सुरू आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा, अध्यापन विद्यालयांतील अभ्यासक्रमात तशी सोय करण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. वास्तविक या निमित्ताने शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा, "बीएड' आणि "डीएड' या अध्यापनविषयक अभ्यासक्रमाचा फेरविचार करण्याची आवश्‍यकता आहे.काळ झपाट्याने बदलतो आहे. नवे तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळे अध्यापनाची अनेक नवीन साधने उपलब्ध होत आहेत. शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात या साऱ्यांचा; तसेच भाषा, समाजशास्त्र, गणित, विज्ञान या विविध विद्याशाखांचा अभ्यासक्रमांत समप्रमाणात समावेश आहे काय, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. असा अभ्यास आपल्याकडे कधी होईल माहीत नाही; पण अमेरिकेत अशाच एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. ते भारतासाठीही उपयुक्त आहेत.
या अभ्यासाचा पहिला निष्कर्ष आहे ः "अमेरिकेतील शिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम संतुलित नाही. तो समाजशास्त्र विषयावर अधिक भर देणारा आहे. त्यामुळे गणित या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.' हा अभ्यास केला आहे, अर्कान्सस विद्यापीठातील शिक्षण सुधारणा विभागाचे प्रमुख जे. पी. ग्रीन आणि संशोधक कॅथरिन शॉक यांनी. अमेरिकेतील पहिल्या पन्नास अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांची पाहणी त्यांनी यानिमित्ताने केली. याशिवाय आणखीही 71 संस्थांच्या अभ्यासक्रमांचा मागोवा त्यांनी घेतला. या अभ्यासाच्या निष्कर्षावर आधारित एक टिपण ग्रीन यांनी अमेरिकेच्या "सिटी जर्नल'च्या ताज्या अंकात दिले आहे.
""शिक्षण हे सर्वंकष आणि संतुलित स्वरूपाचे असायला हवे. सामाजिक जडण-घडण, बहुसांस्कृतिकता यांबरोबरच विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकीही यायला हवी. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात समाजशास्त्राबरोबरच गणितालाही महत्त्वाचे स्थान द्यायला हवे. त्याबाबतची नेमकी स्थिती पाहण्यासाठी आम्ही हा अभ्यास केला,'' असे त्यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.
या प्रस्तावनेत नसलेला एक भाग म्हणजे, विद्यार्थ्यांच्या गणिताबद्दल अमेरिकेला वाटत असलेली चिंता. तेथील अनेक विद्यार्थ्यांना गणितात गती नसल्याचे आणि आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत ते मागे पडत असल्याचे निष्कर्ष यापूर्वी झालेल्या काही पाहण्यांतून पुढे आले आहेत. कुशल शिक्षकांचा अभाव आणि पाठांतरावर भर देणारा अभ्यासक्रम या दोन कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया कच्चा राहत असल्याचे तेथील टीकाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथील "नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स ऑफ मॅथेमॅटिक्‍स' या संघटनेने वर्षभरापूर्वी सरकारला अहवालही सादर केला होता.
या पार्श्‍वभूमीवर शिक्षक प्रशिक्षणाचा नवा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात बहुसांस्कृतिकता, विविधता, सर्वसमावेशकता आदी विषय किती प्रमाणात आहेत आणि त्या तुलनेत गणिताचे प्रमाण काय आहे, हे या अभ्यासात तपासण्यात आले. थोडक्‍यात अभ्यासक्रमातील बहुसांस्कृतिकता आणि गणित यांचे प्रमाण तपासण्यात आले. जर ते एकापेक्षा जास्त असेल, तर स्वाभाविकच गणिताकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते. अमेरिकेतील अध्यापक महाविद्यालयांतील याबाबतचे सरासरी प्रमाण होते- 1.82 म्हणजे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात गणितापेक्षा समाजशास्त्राला 82 टक्के झुकते माप दिले जाते. हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड या विख्यात विद्यापीठांत तर हे प्रमाण दोन आहे. मिसोरी, पेनसिल्व्हानिया या विद्यापीठांत हे प्रमाण उलटे आहे. म्हणजे तेथे गणिताला झुकते माप दिले जाते. मात्र, अशी विद्यापीठे कमी असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदविले आहे.
ही स्थिती बदलावयाची असेल, तर अनेक अडथळे असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. अध्यापन महाविद्यालयांतील प्राध्यापक हीच मुख्य अडचण आहे. बहुसांस्कृतिकता हा विषय अनेकांच्या आवडीचा असल्याने असे घडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर गणित हा विषय घेणाऱ्या (आणि शिक्षक होऊ पाहणाऱ्या) विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असल्याचे त्यांना आढळले आहे. मात्र, यामुळे गणिताकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. औद्योगिकीकरण झालेल्या तीस देशांतील विद्यार्थ्यांच्या गणिताच्या कौशल्याबाबत केलेल्या एका पाहणीत अमेरिकेचे स्थान 24 वे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आइसलॅंड, पोलंड; तसेच युरोप आणि आशियातील काही देशही अमेरिकेच्या पुढे आहेत, असे ग्रीन यांनी म्हटले आहे. म्हणूनच गणितावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
भारतात असा अभ्यास झालेला नाही; पण निष्कर्ष याहून वेगळा असेल, असे वाटत नाही. दहावीच्या परीक्षांचे निकाल याची साक्ष देणारे आहेत, नाही का?