Thursday, December 13, 2007

इतिहासाचा धडा- 2

"झाले गेले विसरून जा,' असे म्हटले जाते; पण झाले गेलेले चटकन विस्मृतीत जात नाही. आठवणी कधी जाग्या होतात सांगता येत नाही. हा झाला वैयक्तिक अनुभव. सार्वत्रिक पातळीवर तर झाले गेलेले सारे इतिहासाच्या पुस्तकात जाऊन बसते (आणि शालेय मुलांच्या बोकांडीही!). पण, समाजाला इतिहासाकडून पाठ फिरवून चालत नाही. इतिहासात अनेक दाखले असतात. त्यांपासून धडा घेतला नाही, बोध घेतला नाही, तर कधी-कधी मोठी किंमत चुकवावी लागते, तर कधी इतिहासाची पुनरावृत्ती होते.

"भारतीय मुस्लिमांचा राजकीय इतिहास' हे पुस्तक मध्यंतरी वाचत होतो. त्यात एक माहिती अशी होती ः भारतात स्थिरस्थावर झाल्यानंतर ब्रिटिश हळूहळू येथील शिक्षण व्यवस्थेत लक्ष घालू लागले. त्या काळी बंगालमध्ये हिंदू मुलांचे शिक्षण पंतोजींच्या पाठशाळेत, तर मुस्लिम मुलांचे शिक्षण मदरशांत होत असे. पाठशाळेतील शिक्षणाचे माध्यम होते बंगाली, तर मदरशातील उर्दू. ही व्यवस्था झाल्यानंतर मुस्लिम पालकांनी बंगालच्या गव्हर्नरकडे एक निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले होते, ""आम्ही सारे मुस्लिम असलो, तरी बंगाली आहोत. उर्दू ही आमच्यासाठी परकी भाषा आहे. त्यामुळे आम्हाला उर्दूतून नव्हे, तर बंगालीमधून शिक्षण दिले जावे.''

बंगाली मुस्लिमांच्या या मागणीत गैर काहीही नव्हते. ते बंगालचेच भूमिपत्र होते. त्यामुळे त्या मातीची भाषा हीच त्यांची भाषा होती. नंतर त्यांची ही मागणी मान्य झाल्याचाही उल्लेख पुस्तकात आहे. बंगाली मुस्लिम मातृभाषेबद्दल सुरवातीपासूनच किती जागरूक होते, हे या पुस्तकातून कळले. पुढे मी स्टॅन्ले वोलपार्ट यांचे "जिना ऑफ पाकिस्तान' हे पुस्तक वाचले. त्यामधील एक तपशील वाचताना मला बंगाली मुस्लिमांच्या वरील निवेदनाची आठवण झाली.

स्वातंत्र्यानंतर (म्हणजेच फाळणीनंतर) जिना प्रथमच पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) गेले. त्यांचे जोरदार स्वागत झाले; पण त्याचबरोबर त्यांना काही निवेदनेही तेथील लोकांनी दिले. त्यात एक होते ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे. त्यात म्हटले होते, "ढाका रेडिओ केंद्रावर उर्दू भाषेचा वापर वाढला आहे. अनेक उद्‌घोषणाही उर्दूतून केल्या जात आहेत. आमची भाषा बंगाली असल्याने बंगाली भाषेचाच वापर झाला पाहिजे.''

आपल्या भाषणात जिना यांनी या निवेदनाचा उल्लेख केला आणि गरजले, ""उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे. पाकिस्तानातील अन्य भाषांमधील (पंजाबी, सिंधी, पख्तुनी, बलुची, बंगाली इ.) संपर्क भाषा म्हणूनही तिचा उपयोग होतो. तुम्हाला उर्दू येत नसेल, तर तुम्ही ती शिकून घ्या.''

मातृभाषेबद्दल कमालीचे हळवे असलेल्या बंगाली युवकांना जिना यांचा हा सल्ला पटला नसला, तरी त्यांनी तो ऐकून घेतला असावा. मात्र, पुढे जेव्हा पाकिस्तानचे शासक बंगाली जनतेची आणि त्यांच्या भाषेची गळचेपी करू लागले, पूर्व पाकिस्तानला एखाद्या अंकित वा वसाहतीच्या देशासारखी वागणूक देऊ लागले तेव्हा तेथील जनता आणि विशेषतः विद्यार्थी पेटून उठले आणि मुक्तीवाहिनीची स्थापना केली. पुढे तीच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची वाहक बनली. अन्य महत्त्वाची कारणे असली, तरी प्रामुख्याने भाषेच्या मुद्द्यावरून स्वतंत्र झालेला बांगलादेश हा जगातील एकमेव देश आहे.

ब्रिटिश राजवटीत बंगाली मुस्लिमांनी गव्हर्नरला दिलेल्या निवेदनाचा इतिहास जिनांना माहीत असता किंवा जिना यांच्या पहिल्या सभेत बंगाली विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाचा इतिहास पाकिस्तानच्या नंतरच्या शासकांना माहीत असता, तर काय झाले असते? उत्तर देणे अवघड आहे; परंतु जिना असतील किंवा पाकिस्तानचे शासक- त्यांनी बंगाली भाषेबाबत इतिहासापासून काही बोध घेतला नाही, हेच खरे.

Thursday, December 6, 2007

इतिहासाचा धडा- 1


अठराशे सत्तावनच्या उठावाला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या उठावाच्या इतिहासाला उजाळा दिला जात आहे. हा उठाव म्हणजे निव्वळ बंड होते, की स्वातंत्र्ययुद्ध होते (की जिहाद होते), हा जुना वादविवादही उफाळून आला आहे. या उठावात भारतीयांनी जो पराक्रम केला त्याच्या गौरवगाथा पुन्हा नव्याने लिहिल्या जात आहेत. या एकूण संग्रामाचे फेरविश्‍लेषण करण्याचा प्रयत्नही होत आहे. मात्र, एका मुद्द्याकडे नव्याने पाहण्याची गरज आहे, असे मला वाटते. तो म्हणजे या उठावाच्या अपशाचा.
हा उठाव असंघटित स्वरूपाचा होता, उठावकर्त्यांकडे साधनांची चणचण होती, पारंपरिक युद्धसामुग्रीवर ते अवलंबून होते, उठावाची व्यापक योजना त्यांच्याकडे नव्हती, याउलट ब्रिटिशांकडे आधुनिक साधने होती, संदेश यंत्रणा होती- त्याच्या जोरावर त्यांनी प्रथम उठावाची व्याप्ती मर्यादित केली आणि नंतर उठाव मोडून काढला. शाळेत असताना परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्‍न असल्याने आपण सर्वांनीच अठराशे सत्तावनच्या अपयशाची कारणे पाठ केली होती. स्वाभाविकपणे परीक्षा संपल्यानंतर ही कारणे आपण विसरूनही गेलो आहोत. पण, ही कारणे आजही आपल्याला लागू पडतात.
कोणतीही गोष्ट करायची असेल, तर त्याची योजना आधी तयार करणे गरजेचे असते. त्यासाठी अभ्यास, शिस्त, डॉक्‍युमेंटेशन, नोंदी, निरीक्षणे यांची गरज असते. एक देश म्हणून, समूह म्हणून (आणि वैयक्तिक पातळीवरही) अनेकदा आपण हे करण्यास कमी पडतो. गेल्या दशकात भारताला पेटंटच्या लढाया लढाव्या लागल्या. प्रथम हळदीची, मग कडूनिंबाची आणि बासमतीची. हळदीचा औषधी उपयोग आपल्याकडे पिढ्यान्‌पिढ्या चालू आहे; परंतु त्याची तशी नोंद नसल्याने अमेरिकेने पेटंट देऊ केले होते. मग आपली धावपळ सुरू झाली आणि इतिहासाची पाने उलटत नोंद शोधू लागलो. हे पेटंट रद्द करण्यात भारताला यश आले; परंतु आपल्या पारंपरिक ज्ञानाचा दस्ताऐवज- डॉक्‍युमेंटेशन- नाही, याची प्रथमच प्रकर्षाने जाणीव झाली.
नोंदी, निरीक्षणे, अभ्यास, आधुनिक साधने आदी बाबी पेटंट किंवा तत्सम गोष्टींसाठीच आवश्‍यक असतात, असे नाही. खेळांतही उपयुक्त ठरतात. "चक दे इंडिया' हा सिनेमा सुपरहिट झाला आहे. त्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत दाखविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा कोच आपल्या खेळाडूंना लॅपटॉपटच्या साह्याने मार्गदर्शन करतो आहे- प्रत्येक भारतीय खेळाडूंचा अभ्यास करून डावपेचांची आखणी करतो आहे, असे त्यात दाखविण्यात आले आहे. हे चित्रण वास्तवदर्शी आहे आणि फक्त हॉकीलाच नव्हे, तर क्रिकेटसह अन्य खेळांनाही लागू होणारे आहे. म्हणूनच सुनील गावस्कर, कपिलदेव, इम्रानखान, जावेद मियॉंदाद, अर्जुन रणतुंगा, अरविंद डिसिल्व्हा यांसारखे दिग्गज खेळाडू असूनही भारतीय उपखंडातील क्रिकेट संघांना परदेशी "कोच' शोधावा लागतो.
स्थानिक कोच नेमताना अडचणी येत असल्या, तरी शिस्तीच्या, निरीक्षणाच्या, आधुनिक साधनांच्या वापराच्या सवयीचाही भाग त्यात आहेच. कारण प्रत्यक्ष खेळ मैदानावर होत असला, तरी त्याची आखणी कागदावर- लॅपटॉपवर- करता येऊ शकते, प्रत्येक खेळाडूंचे कच्चे दुवे ओळखून डावपेच आखता येत असतात. याची सवय ऑस्ट्रेलियादी देशांना अधिक आहे. आता लवकरच भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. अलीकडच्या काळात भारतातील तरुण खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे; तसेच मोठी आक्रमकताही दाखविली आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मानसशास्त्रज्ञांच्या साह्याने या आक्रमकतेचा अभ्यास करणार असल्याचे वृत्त आजच आले आहे. मैदानावर भक्कम कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या यशात या अभ्यासाचा, नियोजनाचा मोठा वाटा आहे.
वैयक्तिक कामगिरीपेक्षा सामूहिक- सांघिक- कामगिरी महत्त्वाची असते. अठराशे सत्तावनच्या उठावातही ही बाब ठळकपणे जाणवते. आजही भारतात वैयक्तिक कामगिरीला महत्त्व आहे. राजकारणापासून खेळापर्यंत अनेक क्षेत्रांत सारा भर वैयक्तिक कामगिरीवर दिसतो. त्यामुळे एकीकडे व्यक्तिमहात्म्य वाढते आणि दुसरीकडे सुमारांना खपवून घेतले जाऊ लागते. अन्य देशांत नेमके उलटे चित्र आहे. इतिहास वाचायचा असतो, तो यासाठीच. मात्र, त्यापासून धडा न घेता केवळ इतिहासातच रमत राहिलो, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.