Friday, May 16, 2008

मल्ल्या यांचा त्रागा


मल्ल्या यांचा त्रागा

कोर्पोरेट संस्कृतीचा एक साधे तत्त्व असते ः जितका पैसा खर्च करू त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक परतावा मिळायला हवा. हा परतावा म्हणजेच नफा मिळत जाणे म्हणजेच यशस्वी होणे. अशा प्रकारे यशस्वी झालेला उद्योजक मग (नफा मिळू शकेल अशा) नवनवीन क्षेत्रांत पैसा गुंतवत जातो. त्यासाठी आधी "मार्केट'चा "सर्व्हे' करतो, गलेलठ्ठ पगार देऊन "सीईओ' नेमतो, मार्केटिंगसाठी अधिकारी नेमतो अन्‌ बाजारपेठ काबीज करू लागतो. अशा प्रकारे यशामागून यश मिळत गेले, की तो एक मोठा यशस्वी उद्योगपती होतो. मग त्याला "जाएंट' म्हणूनही संबोधले जाते. नफा आणि यश मिळविण्याची त्याची भूक हळूहळू वाढत जाते. छोटे अपयशही त्याला डाचू लागते. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचे नेमके हेच झाले आहे.

मद्य उद्योगात नाव कमावलेल्या मल्ल्या यांनी नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्याचे ठरविले आहे. हवाई वाहतूक क्षेत्रात तर ते स्थिरावले आहेतच. भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेला क्रिकेटकडे सध्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले जात आहे. देशातील सर्व स्तरांतील वर्गांना आकर्षित करणाऱ्या या खेळाला करमणुकीचे स्वरूप केव्हाच प्राप्त झाले आहे. या करमणुकीद्वारे आणखी-आणखी पैसा करण्याची युक्ती सध्या चालू असलेल्या "इंडियन प्रिमिअर लीग'द्वारे प्रत्यक्षात येत आहे. एकाच चालीत प्रसिद्धी आणि पैसा हे दोन्ही मिळवून देणाऱ्या या लीगमध्ये पैसा गुंतविण्याची संधी मल्ल्या यांच्यासारख्यांनी दवडली असती, तरच आश्‍चर्य. मुकेश अंबानी, शाहरूख खान, प्रीती झिंटा यांच्याप्रमाणेच त्यांनीही फ्रॅंचायझी घेतली आणि बेंगळूरुच्या संघाचे ते मालक बनले.

मार्केटिंगचे तंत्र वापरत त्यांनी आपल्या संघाला "रॉयल चॅलेंजर्स' हे नाव दिले. "आयकॉन' राहुल द्रवीड कर्णधार बनला. चारू शर्माला "सीईओ' बनविले. कोट्यवधी रुपये खर्च केले. आणखी पैसे द्यायची तयारी ठेवली. मार्केटिंगही जबरदस्त केले. कॅटरीन कैफ, रम्या या अभिनेत्रींनाही घेऊन आपल्या संघाचे "ग्लॅमर'ही वाढविले. थोडक्‍यात गुंतवणूक करताना कसलीही कसर ठेवली नाही.

आता त्यांना अपेक्षा होती, ती रिटर्न्सची- परताव्याची. हा परतावा म्हणजे बेंगळूरुच्या संघाने जिंकत जाणे. मल्ल्या यांच्या कॉर्पोरेट तत्त्वानुसार या अपेक्षेत गैर काहीच नाही; पण त्यांचा अपेक्षाभंग होत गेला. "रॉयल चॅलेंजर्स' एका मागून एक सामना हरत चालला आहे. गुणतक्‍त्यात तो तळाला पोचला आहे.

पाहिजे तेवढा पैसा दिला आहे- अजूनही देण्याची तयारी आहे, "सीईओ' नेमला आहे, मार्केटिंग केले आहे; आणि तरीही परतावा कसा मिळत नाही- आपला संघ जिंकत कसा नाही, असा प्रश्‍न मल्ल्या यांना पडला आहे. अशा प्रकारच्या अपयशाची सवय नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. कॉर्पोरेट जगताच्या नियमानुसार त्यांनी प्रथम "सीईओ'ची हाकालपट्टी केली- आता नंबर आहे, तो द्रवीडचा; पण तडकाफडकी तसे करता येत नसल्याने त्यांनी द्रवीडवर तोंडसुख घेतले आहे. द्रवीड आणि शर्मा यांनी आपली दिशाभूल केली- कसोटीचा वाटेल असा संघ "ट्‌वेंटी-ट्‌वेंटी'साठी निवडला, असा त्रागा ते करीत आहेत.

क्रिकेटमध्ये पैसा जरी असला, तरी त्याला उद्योगाचे स्वरूप आलेले नाही, हेच मल्ल्यांना बहुधा समजलेले नाही. क्रिकेट हा एक खेळ आहे. खेळाडू कितीही कर्तृत्वसंपन्न असले, त्यांच्या नावावर कितीही विक्रम असले, तरी प्रत्यक्ष खेळाच्या दिवशी ते कशी कामगिरी करतात यावरच निकाल अवलंबून असतो. आणि प्रत्येक दिवस सारखा नसतो. एखाद्या संघाला एखादा सामनाच नव्हे, तर संपूर्ण मालिकाच खराब जाते- आणि याला कोणताही संघ अपवाद नसतो.

प्रत्येक संघातील खेळाडू जिद्दीनेच मैदानात उतरत असतो, कोणालाही हरायचे नसते. उद्योगांमध्ये, वाटाघाटींमध्ये "विन-विन' असा एक प्रकार असतो. म्हणजे एकाच वेळी दोन्हीही बाजूंचा विजय होतो. खेळांमध्ये अशी "विन-विन' स्थिती नसते. येथे कोणीतरी एकच जण जिंकतो आणि कोणाला तरी हरावेच लागते. मैदानावरील खेळ, जिद्द, जिगर, "किलिंग इन्स्टिंक्‍ट' हे सारे गुण दाखवूनही, तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल, तर अनेकांच्या पदरी पराभव येतो.

खेळामध्ये विजयाने मनोबल उंचावते, लय प्राप्त होते. यामुळे विजयाची एक मालिकाच निर्माण होऊ शकते. पराभवाने खच्चीकरण होते, लय बिघडते- त्यातून पराभवाची मालिका निर्माण होते. अशा वेळी पराभूत संघाला मनोबल उंचावणे गरजेचे असते. ते उंचावले तरच तो मैदानावर चांगली कामगिरी करू शकतो. मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्या मागे ठामपणे उभारणारे कोणीतरी हवे असतात. ""तुम्ही जिंकू शकता,'' असा विश्‍वास निर्माण करणारे कोणीतरी हवे असतात. एकदा का हा विश्‍वास वाढला, की मैदानावरील खेळ बहरू लागतो अन्‌ त्यातूनच विजय दृष्टिपथात येतो. द्रवीड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अशा प्रकारचा विश्‍वास हवा असताना मल्ल्या यांनी त्यांच्यावर अविश्‍वास दर्शविणारे विधान केले आहे. (त्यामुळे "रॉयल चॅलेंजर्स' पुन्हा एकदा हरले.)

कॉर्पोरेट क्षेत्रातील सारेच नियम खेळांना लागू होत नाहीत, हेच मल्ल्या यांना माहीत नसावे. क्रिकेटमध्ये पैसा खूप आला असला आणि संघ विकत घेण्याची पद्धत रुजत असली, तरी क्रिकेट म्हणजे "बिझनेस हाऊस' नाही, हेच खरे. उद्योग आणि क्रिकेट या दोहोंमधील फरक सर्वच नफेखोरांनी समजून घेतला पाहिजे.

श्रीधर लोणी

No comments: