Sunday, September 2, 2007

गोष्ट मध्यमवर्गीयांची

मध्यमवर्ग ही अतिशय ढोबळपणे वापरली जाणारी संज्ञा आहे. भारतासारख्या देशात या मध्यमवर्गाची विशिष्ट अशी व्याख्याही नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील मोठा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग, असे म्हणता येईल. मात्र, उत्पन्नानुसार या वर्गाचेही कनिष्ठ-, मध्यम-, उच्च- आणि नवश्रीमंत असे किमान चार स्तर तरी पडतात. या चारही स्तरांत काही साम्यस्थळे आहेत, तर काही विरोधाभासही आहे. त्यामुळे मध्यमवर्ग हा एक एकजिनसी समाज असे गृहीत धरून चालणार नाही. भारतातील मध्यमवर्ग हा "मोनोलिथ' नाही.
मध्यमवर्गाचा विषय चर्चेला घेतला, कारण अलीकडेच याबाबतचा एक प्रदीर्घ लेख वाचण्यात आला. "प्रॉस्पेक्‍ट' नावाच्या मासिकात चक्रवर्ती राम प्रसाद यांनी हा लेख लिहिला आहे. "जागतिकीकरण, खासगीकरण आणि माहिती तंत्रज्ञान क्रांती यांमुळे भारतातील मध्यमवर्गाला एक मोठी संधी मिळाली आणि त्यामुळे या वर्गाची भरभराट होत आहे; परंतु राजकीयदृष्ट्या तो उदासीन होत आहे. जोपर्यंत तो राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सजग होत नाही, तोपर्यंत भारतातील विकासप्रक्रिया एकांगीच राहील,' असे लेखकाने म्हटले आहे. या म्हणण्यात तथ्य आहे. कारण एरवी प्रसारमाध्यमांतून आपली मते उच्चरवाने मांडणारे सुशिक्षित मध्यमवर्गीय प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी सुटी साजरी करीत असतात. कोणीही सत्तेवर आला, तरी आपल्या हितांना धक्का बसणार नाही, अशी त्यांची धारणा असावी आणि ती वृथा नाही. पण, हा वर्ग आपल्याच कोशात गुरफटत गेल्यास, प्रसाद म्हणतात त्याप्रमाणे, भारतात एकीकडे "विकास', तर एकीकडे "भकास' असेच चित्र राहणार, हे नक्की. म्हणजेच विषमता वाढत जाणार. कोणत्याही देशाचा कणा म्हणजे हा मध्यमवर्ग असतो. म्हणूनच मध्यमवर्गीयांकडे आशेने, अपेक्षेने पाहिले जाते आणि त्याचबरोबर समाजातील अनेक दोषांचे खापरही त्यांच्यावरच फोडले जाते. अशा रीतीने मध्यमवर्गाकडून "हीरो'च्या अपेक्षेने पाहिले जाते. त्यात तो अपयशी ठरला, की त्याला "व्हिलन' ठरविले जाते. सध्या भारतात नेमके हेच घडत आहे. मध्यमवर्गीय धाडसी होत आहे. तो शेअर बाजारात पैसा गुंतवत आहे, स्वतंत्र उद्योग किंवा व्यवसाय करू पाहत आहे, आयुष्यभर पैसा जपून ठेवण्याची पिढीजात वृत्ती सोडून खर्चिक होत आहे, कर्ज काढून घर तर घेतोच आहे; पण मोटारही घेतोय आणि परदेशी पर्यटनासही जात आहे. ज्या प्रायव्हेट कॉलेजेसना तो पूर्वी नाके मुरडत होता, तेथे लाखो रुपये खर्चून आपल्या मुलांना शिक्षणाला पाठवत आहे. थोडक्‍यात आपली स्वतःच बाजारपेठ तो स्वतःच वाढवत आहे आणि म्हणूनच बड्या भांडवलदारी कंपन्या परदेशांतून भारतात येत आहेत.
तीस कोटींची ही भली मोठी बाजारपेठ ताब्यात यावी म्हणून असेल, किंवा विकासदर सातत्याने आठ टक्‍क्‍यांवर ठेवल्यामुळे असेल, किंवा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून असेल, "एक उगवती महासत्ता' म्हणून अमेरिकेसह अनेक देश भारताचा उल्लेख करीत आहेत. यामुळे येथील मध्यमवर्गीयांचा "इगो'ही छान सुखावतो आहे. आर्थिक आघाडीवर भारताची आगेकूच होत असली, तरी विषमता वाढते आहे. मध्यमवर्गीयांइतकेच म्हणजे तीस कोटी लोक दारिद्य्ररेषेच्या खाली आहेत. आर्थिक विकासामुळे हे प्रमाण कमी होईल आणि हळूहळू हे गरीबही मध्यमवर्गीयांच्या गटात जाऊन बसतील, असा सिद्धांत काही तज्ज्ञ मांडतात. तो खराही आहे; पण ज्या "कल्याणकारी राज्या'च्या संकल्पनेमुळे येथील लाखो गरीबांचे मध्यमवर्गात रुपांतर झाले, त्या संकल्पनेलाच आता हद्दपार केले जात आहे. मग कोणती शिडी घेऊन गरीब लोक मध्यमवर्गात जाणार?
"कल्याणकारी राज्या'च्या धोरणामुळे अनेक गरीबांना विशेष खर्च न करता थेट विद्यापीठात वा "आयआयटी'त जाऊन उच्च शिक्षण घेता आले, आरोग्य सेवा घेता आल्या. आज या साऱ्या बाबींतून सरकार माघार घेत आहे. "उच्च शिक्षण ही आमची जबाबदारीच नाही,' अशी भूमिका सरकार घेत आहे. मध्यमवर्गीयालाही ही आपली गरज वाटत नाहीए. कारण तो आता सुस्थित झाला आहे. एके काळी तो शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलने करायचा. रेशन, रॉकेल व्यवस्थित मिळावे म्हणून रस्त्यावर यायचा. झोपडवस्तीतील गरीबांच्या दुःखाने कळवळायचा. त्यांना सहानुभूती दाखवायचा. आज तो एखाद्या "मॉडेल'च्या वा सिनेनटीच्या आत्महत्येमुळे कळवळतो, एखाद्या सेलिब्रेटीवरील अन्याय दूर व्हावा म्हणून "एसएमएस पोल'मध्ये भाग घेतो; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्येने त्याचे काळीज चर्र होत नाही. त्याला वेध लागले आहेत ते "प्रगत आणि महासत्ता' झालेल्या भारताचे. एकदा का भारत महासत्ता झाला, की सारे प्रश्‍न सुटणार आहेत!
आता ज्या मध्यमवर्गाचा उल्लेख मी करतोय तो उच्च मध्यमवर्गीय आहे किंवा नवश्रीमंत तरी आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय अजूनही संवेदनशील आहे, जुन्या पुराण्या विचारांना, नैतिकतेला, सिद्धांतांना चिकटून आहे. पण, या साऱ्यांचे "ओझे' नवश्रीमंतांनी केव्हाच झुगारून दिले आहे आणि उच्च मध्यमवर्गीय झुगारून देण्याच्या मार्गावर आहेत. दुर्दैवाने याच नवश्रीमंतांच्या आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात माध्यमे असल्याने त्यांमधील चित्रणही देशाच विकासप्रक्रियेप्रमाणेच एकांगी होत आहे.

1 comment:

Anonymous said...

Indian middle class is great! It definately has played an important role in the past and even now its role is vital.