Sunday, September 9, 2007

वैयक्तिक आणि सार्वजनिक

आपल्या स्वतःच्या स्वच्छतेची आपण खूप काळजी घेत असतो. दररोज स्नान करतो. तऱ्हेतऱ्हेच्या साबणांचा वापर करतो. डिओडरंट्‌स, सेंट यांचाही वापर करीत असतो. चांगले कपडे घालतो. नेटका दिसण्याचा आपला प्रयत्न असतो. जी गोष्ट वैयक्तिक स्वच्छतेची तीच घराचीही. आपले घर स्वच्छ असावे, छान दिसावे याची काळजीही आपण घेत असतो. हॉलच नव्हे, तर बेडरूमच्या सजावटीकडेही आपण लक्ष देत असतो. थोडक्‍यात स्वतःच्या आणि घराच्या स्वच्छतेबाबत आपण कमालीचे दक्ष असतो. स्वच्छतेबद्दलची आपली ही दक्षता स्वतःपासून सुरू होते आणि घरापर्यंत येऊन थांबते. आपली सोसायटी, आपला परिसर, आपले शहर, आपला देश स्वच्छ असावा, यासाठी मात्र हवी तितकी दक्षता आपण घेत नाही. आपला परिसर किंवा शहर स्वच्छ असू नये, असे आपल्याला वाटत नाही, असे नाही; परंतु ते अशा "वाटण्यापुरताच' मर्यादित राहते. ""परिसर किंवा शहर स्वच्छ करण्याचे काम माझे नाही, इतरांनीही पुढाकार घ्यावा, '' अशी आपली भावना असते. सर्वांचीच ती भावना असल्याने कोणी पुढाकार घेत नाही. ज्यांचे हे काम आहे, ती महापालिका या साऱ्याला अपुरी पडते. मग परिसर, शहर अस्वच्छच राहते. अगदी विद्रूप होऊन जाते.
आपल्यापैकी बहुतेकांना आई-वडलांचा धाक असतो. त्याचबरोबर आजी-आजोबा किंवा काका-मामा या नजीकच्या वडिलधाऱ्या नातेवाईकांचाही धाक असतो. घरात त्यांनी लावलेली शिस्त पाळण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करतो. त्यांच्या मनाविरुद्ध करणे शक्‍यतो टाळतो. त्यांचा अवमान होईल, अशी कोणतीही कृती आपण करत नाही. सर्वच शिक्षकांबद्दल आपल्या मनात अशी भावना असतेच असे नाही; पण काही शिक्षक आपल्या आदराला नक्कीच पात्र ठरलेले असतात. शिकत असताना त्यांची शिस्त पाळण्याचाही प्रयत्न आपण करीत असतो. अगदी मनापासून नसली, तरी दंडाच्या भीतीपोटी आपण कॉलेजची शिस्तही पाळत असतो. पुढे नोकरीच्या ठिकाणी तेथील शिस्त पाळतो. याशिवाय स्वतःची अशी एक शिस्त आपण घालून घेतलेली असते. तीही पाळत असतो. वैयक्तिक आयुष्यात अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर शिस्त पाळणारे आपण सारे सार्वजनिक शिस्तीच्या बाबतीत मात्र बेफिकीर असतो. वाहतुकीचा "सिग्नल' हा मोडण्यासाठीच आहे, अशी आपली समजूत असते. चौकात पोलिस असला, तर "लाल दिवा' असल्यास कसेबसे थांबतो; पण तो नसला की सिग्नल तोडून सुसाट सुटतो. या बेशिस्तीमुळेच वाहतुकीची कोंडी होत असते. रांगेचा तिटकारा असल्याने ती शक्‍यतो मोडण्याचाच आपला प्रयत्न असतो.
वैयक्तिक आयुष्यात आपण काटकसरी असतो. पै अन्‌ पैची बचत करत असतो. घरात असताना विजेची बचत करत असतो. म्हणजे बेडरूममध्ये कोणी नसल्यास तेथील दिवा बंद ठेवतो. रात्री झोपताना न चुकता फ्रीज बंद करतो. परंतु, दिवसाही सोसायटीतील दिवे चालू असले, तरी ते बंद करण्याची तसदी आपण घेत नाही. हीच गोष्ट कार्यालयातील. आपले काम संपल्यावर आपल्या खोलीत अन्य कोणी नसेल, तर दिवे बंद करायला हवेत; मात्र ते शिपायाचे काम असल्याने आपण तसेच निघून जातो. घरच्या फोनवरून वा मोबाईल फोनवरून बोलताना मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बिलाचा विचार असतो. कार्यालयातील फोनवर बोलताना हा विचार जवळ-जवळ नसतो. वैयक्तिक मालाबद्दल काळजी करणारे आपण सार्वजनिक मालमत्तेचा अजिबात विचार करीत नसतो. आपले स्वातंत्र्य आपल्याला खूप प्रिय असते आणि त्यात काही गैर नाही; परंतु आपल्या स्वातंत्र्याबद्दल आग्रही असणारे आपण अनेकदा दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या संकोच करीत असतो. खासगी जीवनात भित्रे असणारे अनेक जण समूहात गेले, की शूर वीर होतात. एरवी मुकाट्याने गप्प बसणाऱ्यांना कळपात गेले, की वाचा फुटते!
थोडक्‍यात आपला वैयक्तिक चेहरा आणि सार्वजनिक चेहरा वेगळा आहे. हे दोन्ही चेहरे परस्परविरोधी आहेत. असे का व्हावे? सामाजिक मूल्यांपेक्षा कौटुंबिक मूल्यांनाच अधिक महत्त्व दिल्याने असे होत असावे काय? स्वतःशी, कुटुंबाशी, शाळा-महाविद्यालय आणि नोकरी करीत असलेल्या संस्थेशी जशी बांधिलकी (तीही उतरत्या क्रमाने!) निर्माण झाली, तशी समाजाबद्दल निर्माण झालेली नाही, हा याचा अर्थ आहे का? सामाजिक जबाबदारीचे भान आपल्याला नाही, असे म्हणता येईल काय? "सामूदायिक जीवन' हा विषय शाळेत अभ्यासाला होता; परंतु परीक्षेला नव्हता. त्याचा तर परिणाम नाही ना? समाजसेवा, कार्यानुभव, स्काऊट हे विषय शाळेत "साईडलाईन'ला होते, त्याचाही हा परिणाम आहे काय? आपण सारेच कमालीचे स्वार्थी आणि आत्ममग्न असल्याने असे होत असावे काय?
अशी अनेक प्रश्‍ने उपस्थित करता येतील; पण त्याचे उत्तर देण्याचे धाडस आपल्यात आहे काय? सर्वांच्या बाबतीत नसले, तरी समाजातील 95 टक्के लोकांच्या बाबतीत हे लागू असल्याने उत्तर आपल्यालाच द्यावयाचे आहे. ते देऊन प्रत्येकाने स्वतःत बदल केला, तरच भारत महान होईल! मग "मेरा भारत महान' असे म्हणण्याचीही गरज भासणार नाही.

2 comments:

Anonymous said...

The point which you've raised is quite correct. The problem is social. But solution has to come fropm individual. If everyone decide and practice to follow descipline and try to keep his/her area clean, then picture will bw changed. Let's start from ourselves.

Anonymous said...

Bhartat swarthi lok khup ahet ase tumhala mhanayache ahe ka?