Sunday, September 30, 2007

विज्ञान- न संपणारा प्रवास


पदार्थ हा कणाकणांनी बनलेला असतो. त्याच्या लहानातल्या लहान कणाला अणू असे म्हटले जाते. हा अणू अविनाशी असल्याचे मानले जात होते. अणूसाठी इंग्रजीत "ऍटम' हा शब्दप्रयोग केला जातो. ग्रीक भाषेत त्याला "ऍटमस' असे म्हटले जाते आणि त्याचा अर्थ आहे- ज्याचे विभाजन करता येत नाही, असा तो. मात्र, हळूहळू अणूचेही विभाजन करता येणे शक्‍य असल्याचे लक्षात आले. अणूच्या अंतरंगात एक केंद्रक असतो आणि त्याच्या भोवती इलेक्‍ट्रॉन्स फिरत असतात, केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, हे संशोधनातून स्पष्ट झाले. प्रोटॉनही कशापासून तरी म्हणजे क्वार्कपासून बनलेले असल्याचेही कालांतराने लक्षात आले...

* * *

पृथ्वी स्थिर असून सूर्य-चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याचा समज एके काळी होता. मात्र, तो चुकीचा असल्याचे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. सूर्य हा तारा असून, पृथ्वीसह अन्य ग्रह त्याच्याभोवती फिरत असल्याचे मान्य झाले. सुरवातीच्या काळात बुध, मंगळ, शुक्र, गुरू आणि शनी हे अन्य ग्रह असल्याचे लक्षात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुर्बिणी उपलब्ध होत गेल्या, तसा युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचाही शोध लागला. मात्र, प्लुटोसारखे आणखीही काही गोल सूर्यमालेत असल्याचे स्पष्ट होत गेले. त्यामुळे प्लुटोला ग्रह म्हणावे की नाही याबद्दल प्रश्‍न निर्माण झाला. अखेरीस चार-पाच महिन्यांपूर्वीच जगभरातील खगोलशास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी ग्रहाची नवीन व्याख्या करण्यात आली. त्यानुसार प्लुटो स्वतंत्र ग्रह नसल्याचे या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले...

* * *

विज्ञानात एखादी बाब वा सिद्धांत प्रस्थापित झाला म्हणजे ते अंतिम सत्यच असते असे नाही, हे सांगणारी ही उदाहरणे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एखादी रूढ समजूत किंवा नियम चुकीचा असल्याचे शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिल्याची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात. वैज्ञानिक सत्य समाजाच्या गळी उतरविताना अनेक शास्त्रज्ञांनी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केलेली नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.

निरीक्षण आणि सार्वत्रिक अनुभूती यांद्वारे प्रस्थापित सत्य हे असत्य असल्याचे स्पष्ट झाल्यास विज्ञान त्याचा स्वीकार करते. विज्ञान हे नेहमीच सत्याच्या शोधात असते आणि ते गवसल्याचा दावा ते कधीच करीत नाही. म्हणूनच, "तज्ज्ञांची सार्वत्रिक मान्यता मिळू शकेल अशा निश्‍चित विधानांचा न संपणारा शोध म्हणजे विज्ञान,' अशी विज्ञानाची एक व्याख्या केली जाते. मराठी विश्वकोशात या व्याख्येचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक विज्ञानाची एकच एक अशी व्याख्या नाही. निसर्ग आणि भौतिक जग समजून घेण्याची मानवी प्रवृत्ती म्हणजे विज्ञान. ही प्रवृत्ती कधीही संपणार नाही आणि त्यामुळे विज्ञानाचा प्रवासही न संपणारा आहे.

विज्ञानाला इंग्रजीत "सायन्स' असे म्हणतात. "सायन्शिआ' या लॅटिन शब्दावरून तो घेण्यात आला आहे. "माहीत करून घेणे' हा त्याचा अर्थ. विशिष्ट पद्धतीने केलेल्या अभ्यासाला विज्ञान म्हणता येईल. या अभ्यासाला एक शिस्त असते. त्याची एक पद्धत असते. निरीक्षणे, प्रयोग हे त्यामधील प्रमुख घटक असतात. हा अभ्यास तपासता येऊ शकतो आणि जगात कोठेही त्याचा पडताळाही घेता येऊ शकतो. कालांतराने पडताळा घेताना आधीच्या निष्कर्षात काही बदल झाल्यास आणि त्याचाही सार्वत्रिक अनुभव आल्यास त्यात त्यानुसार बदलही करता येऊ शकतो. म्हणजेच सतत दुरुस्ती करण्याची सोय विज्ञानात आहे. विज्ञान हे अशा प्रकारे प्रवाही असते. त्याचे ज्ञान प्रगतिशील असते. त्यामुळे विज्ञान हे अन्य ज्ञानशाखांपेक्षा वेगळे ठरते. विज्ञानात वैयक्तिक अनुभूतीला आणि वैयक्तिक समजुतीला स्थान नाही. विज्ञान वस्तुनिष्ठ असते, स्थळ आणि काळनिरपेक्ष असते. अर्थात प्रत्येक वैज्ञानिक नियमाला विशिष्ट पद्धत, विशिष्ट निकष लागू होतात. या नियमांचा अन्यत्र पडताळा घेताना पद्धत आणि निकष सारखे असणे आवश्‍यक असते.

विश्वकोशात विज्ञानाच्या काही व्याख्या दिल्या आहेत. त्यांपैकी एक अशी ः "विज्ञान म्हणजे सुसंघटित विशेष ज्ञान.' अमुक म्हणजे काय हीच प्रेरणा असल्याने विज्ञानाची व्याप्ती मोठी आहे. पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणांपासून अवकाशापर्यंत नानाविध विषयांचा अभ्यास विज्ञानाद्वारे होतो. मात्र, ढोबळमानाने भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र असे वर्गीकरण करता येते. दोहोंमध्ये निसर्ग, भोवतालचे जग आणि सजीव यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो. त्यातूनच विज्ञानाच्या नव्या शाखांचा जन्म होतो. म्हणूनच विज्ञान हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे विज्ञान म्हणजे काहीतरी अगम्य, शास्त्रज्ञांपुरता मर्यादित असलेले ज्ञान असे वाटण्याचे काहीही कारण नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे विज्ञान नेहमीच सत्याचा शोध घेत असतो. आणि त्यासाठीची साधने असतात- वस्तुनिष्ठ निरीक्षणे, प्रयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विश्वासार्ह माहितीची देवाण-घेवाण. मात्र, कधी-कधी याच साधनांचा दुरुपयोग करीत बनावट संशोधनही झाल्याची उदाहरणे आहेत. "पिल्टडाऊन मॅन'चे उदाहरण प्रसिद्ध आहे. गेल्या शतकाच्या सुरवातीला एका हौशी भूगर्भशास्त्रज्ञास इंग्लंडमधील ससेक्‍स येथील पिल्टडाऊन येथे कवटी आणि जबड्याच्या हाडांचे अवशेष सापडले. सुमारे दहा लाख वर्षांपूर्वीच्या मानवाच्या हाडांचे हे अवशेष असल्याचे 1912 मधील शास्त्रज्ञांच्या एका बैठकीत जाहीर करण्यात आले. या मानवाचे "पिल्टडाऊन मॅन' असे नामकरणही करण्यात आले. मानवी उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा दुवा हाती लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक शास्त्रज्ञांनी या शोधास आक्षेप घेतला. 1950 च्या सुमारास या हाडांच्या अवशेषांचे आधुनिक पद्धतीने रासायनिक विश्‍लेषण करण्यात आले. तेव्हा लक्षात आले, की दोन वेगळ्या स्रोतांचे ते अवशेष आहेत! आणि ती सहाशे वर्षांपेक्षा अधिक जुनी नसल्याचेही स्पष्ट झाले.

कार्यकारणभाव तपासणे हे विज्ञानाचे मूळ उद्दिष्ट आहे; मात्र त्याचबरोबर "मानवाचे कल्याण' हेही उद्दिष्ट असतेच. म्हणूनच विज्ञानातील अनेक सिद्धांतांचा, नियमांचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. आजची आपली सारी जीवनशैलीच मुळी तंत्रज्ञानाने व्यापलेली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर आपण करीत आहोत. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे मानवाचे जगणे केवळ सुसह्यच नव्हे तर सुखद झाले आहे आणि आता तर ते सुखाच्या पलीकडे- चंगळवादाकडे- झुकले आहे. निसर्गाचा अभ्यास करता-करता, निसर्गातील कोडी सोडविता-सोडविता निसर्गावर मात करण्यापर्यंत मानवाची मजल गेली आहे. म्हणूनच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि आता "वैश्विक तापमानवाढी'सारखी समस्या निर्माण झाली आहे.

विज्ञानाच्या साह्याने माणूस एकीकडे परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहे आणि दुसरीकडे देश-धर्म-अस्मिता यांच्या नावाखाली पृथ्वीवरील माणसांचाच- आपल्या भाईबंदांचाच- जीवही घेत आहे. त्यासाठी विज्ञानाचाही वापर करीत आहे. खरे तर विज्ञानाचा- तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे. आणि त्यात विज्ञानाचा कोणताही दोष नाही. अणूच्या विभाजनातून मुक्त होणाऱ्या मोठ्या ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी करायचा की बॉम्ब बनविण्यासाठी करायचा याचा निर्णय मानव करीत असतो. सोनोग्राफी तंत्राने रोगनिदानासाठी शरीराच्या अंतरंगात डोकवायचे, की गर्भ मुलीचा आहे का मुलाचा हे पाहायचे याचाही निर्णय माणसाने करायचा असतो.

निसर्ग समजून घेणे, त्याचे नियम तपासणे, काही मूलभूत नियमांचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करणे आणि हेच तंत्रज्ञान निसर्गाच्या आणि मानवाच्या विरोधात वापरणे.. या वेगवेगळ्या आणि स्वतंत्र बाबी आहेत आणि त्या साऱ्यांच्या मुळाशी मानवी प्रकृती आहे. त्यामुळे वैज्ञानिक वृत्ती जोपासत असतानाच विवेकही जागृत असणे आवश्‍यक असतो. या दोहोंच्या संगमातच मानवाचे कल्याण आणि पर्यायाने शांतता सामावलेली आहे.

(पूर्वप्रसिद्धी- सकाळ, 22 फेब्रुवारी 2007)

1 comment:

Anonymous said...

You have made a point.