Monday, July 23, 2007

'बॉलिवूड' का नको?

'बॉलिवूड' का नको?
हिंदी चित्रपटसृष्टीला "बॉलीवूड' म्हणू नका. त्यामुळे आम्हाला अपमान झाल्यासारखे वाटते,' असे मत अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शाह यांनी अलीकडेच व्यक्त केले आहे.
गेली अनेक वर्षे "बॉलिवूड' हे विशेषण अतिशय लाडाने, कौतुकाने वापरले जात आहे. त्याची सुरवात कधी आणि कशी झाली हे माहीत नाही; पण या विशेषणात काही आक्षेपार्ह आहे, असे कोणाला वाटले नाही. अमिताभ आणि नासिरने ताजे विधान करेपर्यंत या विशेषणाला कोणीही जाहीरपणे आक्षेप नोंदविला नव्हता. या दोन अभिनेत्यांनीही प्रथमच याबाबतचे मत मांडले आहे.
"बॉलिवूड' या शब्दाचे मूळ आहे "हॉलिवूड'मध्ये. अमेरिकेतल्या या सिनेसृष्टीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर "हॉलिवूड'चा दबदबा निर्माण केला आहे. कलात्मकता, भव्यदिव्यपणा, सकस आणि आशयसमृद्ध कथा, दर्जेदार अभिनय, निर्मितीमूल्य, चांगल्या सिनेमांना पारितोषिक देण्याची पारदर्शक आणि आदर्श पद्धती, ग्लॅमर, तंत्रज्ञान या साऱ्या निकषांवर "हॉलिवूड'च्या सिनेमांनी आपली मुद्रा उमटविली आहे. म्हणूनच "हॉलिवूड'ची मोहिनी टिकून आहे. या चित्रसृष्टीने दिलेल्या एकाहून एक सरस सिनेमांनी "हॉलिवूड' हे ब्रॅंड निर्माण केले आणि उत्तरोत्तर या ब्रॅंडचे मूल्य वाढतच गेले.
"हॉलिवूड'च्या या ब्रॅंडचा फायदा घेत मुंबईतील हिंदी चित्रसृष्टीचे कधीतरी "बॉलिवूड' असे बारसे करण्यात आले. (त्याच्या आधीपासून हिंदी सिनेमांचे निर्माते आणि दिग्दर्शक "हॉलिवूड'च्या कथांपासून "प्रेरित' होत असतच.) पाठोपाठ मद्रासच्या सिनेवृष्टीचे "टॉलिवूड' आणि लाहोरच्या सिनेजगताचे "लॉलीवूड' असे नामकरणही झाले! आम्हा भारतीयांना पाश्‍चिमात्य देशांचे, त्यातही इंग्रजी बोलणाऱ्यांचे कमालीचे आकर्षण आहे. आम्ही इंग्रजांकडून भाषा घेतली, वेशभूषा घेतली, त्यांनी निर्माण केलेले ब्रॅंड घेतले आणि आणखी बरेच काही घेतले. हे सारे घडत गेले ते उत्तमतेच्या, गुणवत्तेच्या आग्रहामुळे नाही. यामागे आहे ती आमची गुलामगिरीची मानसिकता. आम्ही कितीही चांगले काम केले, तरी पाश्‍चिमात्यांनी- विशेषतः ब्रिटिश किंवा अमेरिकनांनी त्याचे कौतुक केल्याखेरीज आमची छाती गर्वाने फुगत नाही. (इंग्रजांनी आमच्यावर दीडशे वर्षे राज्य केल्याचा हा परिपाकच म्हणावा लागेल.)
"बॉलिवूड'मधील "फिल्मफेअर' पुरस्कार "ऑस्कर'च्या धर्तीवर प्रदान केला जातो. तिकडे "अमेरिकन ऑयडॉल' सुरू झाले, की आमच्याकडे लगेचच "इंडियन ऑयडॉल' सुरू होतो आणि "व्हू वॉंट्‌स टू बी मिलिनिअर' कार्यक्रम लगेचच "कौन बनेगा करोडपती' म्हणून समोर येतो. चित्रपटच नव्हे, तर साहित्य, शिक्षण, उद्योग, खेळ आदी अनेक क्षेत्रांमध्ये आम्ही पाश्‍चिमात्यांची नक्कल करण्यातच धन्यता मानतो आणि आमची कामगिरी पाश्‍चिमात्यांच्या नजरेतूनच पाहतो. त्यामुळेच आमच्याकडील पुणे हे कधी "ऑक्‍सफर्ड ऑफ ईस्ट' असते, तर कधी "भारताचे डेट्रॉईट' असते! माहिती तंत्रज्ञानामुळे सारे जग ज्या बंगळूरकडे आकर्षित होते, त्यालाही आम्ही कौतुकाने "इंडियन सिलिकॉन व्हॅली' म्हणतो. भारतातील (त्यातल्या त्यात) दर्जेदार संस्थाही "एमआयटी' (पुण्यातली नव्हे, अमेरिकेतली) किंवा "हॉर्वर्ड' होण्याचे स्वप्न पाहत असतात. आमचा सचिन कितीही थोर असला, तरी डॉन ब्रॅडमनने प्रमाणपत्र दिल्याखेरीज आम्हाला त्याची थोरवी पटलेली नव्हती. आणि आताही चॅपेल बंधूंनी त्याची नालस्ती सुरू केल्यानंतर आम्हालाही सचिन संपल्याचा साक्षात्कार होत आहे.
याचा अर्थ भारतात काही दर्जेदार, अस्सल नाही, असे नाही. खरेतर अनेक गोष्टींत आपण इतरांपेक्षा सरस आहोत. आपल्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जो अमेरिकेला नाही. ज्यावेळी आताचे प्रगत देश रानटी अवस्थेत होते, त्यावेळी आमच्याकडे सिंधू संस्कृती नांदत होती. तक्षशिला आणि नालंदा ही विद्यापीठे जगभरात नावाजलेली होती. कला, शिल्पकला, वास्तूरचना, साहित्य आदी क्षेत्रांत प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातही भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा इतिहास गोंजारत बसावा असे नाही आणि स्मरणरंजनात रमावे असे नाही; पण या इतिहासातून प्रेरणा घेऊन आम्हीही काही तरी करू शकतो, हा आत्मविश्‍वास जरी निर्माण झाला तरी पुरेसा आहे. अलीकडच्या काळात काही क्षेत्रांत भारत आणि भारतीय खरोखरीच चांगली कामगिरी करीत आहेत. एक नवा आत्मविश्वास त्यातून निर्माण झालेलाच आहे. त्याच्या जोरावर गुलामगिरी मनोवृत्ती टाकून दिली आणि आमचा ब्रॅंड आम्ही विकसित करू शकलो तरी पुष्कळ आहे. अमिताभ आणि नासिरच्या विधानांचा असा अन्वयार्थ काढला, तर त्यांच्या म्हणण्यातील तथ्य पटू शकते.

2 comments:

Anonymous said...

va chan lekh aahe...good job... tumhi media madhye kam karta ka ho?

Unknown said...

पंत,
नक्कलच असली वाटण्याचा जमाना आहे राव! मग किती चिडचिड करून घ्यायची स्वतःची? अस्सल काय आहे ते आपण मनाशी समजू किंवा आपल्या मुलाबाळांना शिकवू. दुसऱ्यांच्या मुलांना शिकवण्याचे दिवस राहिलेत का? कातडे पांघरून गाढव वाघ होत नसते एवढे मनाशी म्हणायचे आणि गप्प बसायचे!