Wednesday, July 18, 2007

काळाचा महिमा

काळाचा महिमाआजची मुले फार काही वाचत नाहीत, अशी लाडिक तक्रार आजकालचे आई-बाबा करीत असतात. मुले वाचत नसल्याची विशेष खंत या तक्रारीच्या सुरात दिसत नसल्याने लाडिक हा शब्दप्रयोग केला आहे. कारण ही मुले तास न्‌ तास टीव्ही किंवा कॉम्प्युटरसमोर बसतात. पोकेमॉन ते हनुमानपर्यंतच्या सिरियल्स पाहतात आणि तशाच प्रकारे गेम्स कॉम्प्युटरवर खेळत असतात. यात फार गैर आहे असेही नाही. कारण यांपैकीच बहुतेक मुले परीक्षांतही छान मार्क वगैरे मिळवत असतात. थोडक्‍यात अशी (शहरी, मध्यमवर्गीय आणि बाजारपेठेच्या दृष्टीने ग्राहक असलेली) मुले "स्मार्ट' प्रकारात मोडतात. हॅरी पॉटर हा अशा स्मार्ट मुलांचाच एक प्रतिनिधी. आजच्या पिढीतील लहान मुलांचे काल्पनिक विश्व पुस्तकांच्या पानांत आणि सिनेमाच्या पडद्यांवर हॅरी पॉटरने (म्हणजेच रॉलिंग बाईंनी) साकारले आहे. हॅरी पॉटरच्या सातव्या पुस्तकाच्या आणि पाचव्या सिनेमाच्या निमित्ताने सध्या जगभरातील माध्यमांमध्ये (आणि म्हणून अन्यत्रही) हा विषय चर्चेत आहे. हॅरी पॉटर मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडतो हे खरे असले, तरी सध्या त्याला म्हणजे त्याच्या पुस्तकांना आणि सिनेमांना मिळणारी जी प्रसिद्धी आहे तिला "हाईप' असेच म्हणावे लागेल. हा "हाईप' का केला जात आहे?हॅरी पॉटर ही काही अभिजात साहित्यकृती नाही. किंवा त्याच्या सिनेमांनाही उच्च दर्जाची कलाकृती म्हणता येणार नाही. मात्र, हॅरी पॉटर मालिकेतील तब्बल 33 कोटी पुस्तके जगभर खपली आहेत. सुमारे 65 भाषांत त्यांचा अनुवाद झाला आहे आणि लेखिका जे. के. रॉलिंग यांनी आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. आपल्या मुलीला गोष्ट सांगता-सांगता रोलिंगबाईंनी हॅरी पॉटरला जन्म दिला. तो काळ होता 1995 चा. जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होत होती. इंटरनेटचे जाळे विस्तारत चालले होते आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रसार माध्यमांच्या विस्तारास सुरवात झालेली होती. दिवाणखान्यातील टीव्हीवर सारे जगच एकवटत होते. अमूक एक माहिती क्षणार्धात जगाच्या दुसऱ्या टोकाला जात होती. माहितीच्या प्रसाराचा वेग भलताच वाढत होता. (जगभरातील गणपती एकाच वेळी दूध पिण्याची घटना याच सुमारास घडली हा योगायोग नव्हे.) कार्टून नेटवर्क, डिस्ने आदी खास मुलांच्या वाहिन्याही जगभर दिसू लागल्या होत्या. या वाहिन्यांवरील "सुपर हिरों'मध्ये मुले रमू लागली होती; त्याचबरोबर असेच आणखी काहीही त्यांना हवे वाटत होते. हॅरी पॉटरचे आगमन झाले ते या पार्श्‍वभूमीवर. मुलांना, त्यांच्याच वयाचा एक "सुपरहिरो' हॅरी पॉटरच्या निमित्ताने मिळाला. इंटरनेट युगातील या नव्या बालनायकाने मुलांचीच नव्हे तर त्यांच्या आई-बाबांच्या मनाचा ठाव घेतला. हॅरी पॉटरची चलती आहे हे पाहून (आपलीही चलती करण्यासाठी) प्रसारमाध्यमांनी त्याला उचलून धरले आणि हॅरी पॉटर जगभर पोचला. पुढे जे काय झाले, त्याचा इतिहास ताजा आहे.हॅरी पॉटरच्या "हाईप'चे हे एकमेव कारण नाही. खरे कारण तर आजच्या "मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी'मध्ये दडले आहे. खरे तर हे इतके सत्य आहे, की "दडले आहे' असे म्हणणेच चुकीचे आहे. आजच्या जगात कोणत्या घटनेचा "इव्हेंट' होईल आणि कोणती वस्तू "कमोडिटी' बनून "मार्केट'मध्ये येईल हे सांगता येणार नाही. अमूक एक गोष्ट जगाला हवी आहे, तिला "मार्केट' आहे याची जाणीव होताच, ती ती गोष्ट बाजारपेठेत येऊ लागते. पुस्तकांपासून शस्त्रास्त्रांपर्यंत कोणतीही गोष्ट याला अपवाद नाही. हॅरी पॉटरच्या बाबतीत हेच झालेले दिसते. बाळगोपाळांचा हा आवडता नायक "ब्रॅंड' बनला आहे. या "ब्रॅंड'ला प्रसिद्धी देऊन माध्यमेही आपला "ब्रॅंड' आणखी "एस्टॅब्लिश' करणारच. हॅरी पॉटरबद्दल बोलणे (वाचणे हा भाग सोडून द्या!) हेही "मॉडर्निटी'चे, "रिलेव्हंट' असल्याचे लक्षण आहे हे लक्षात आल्यावर अनेक जण चलाखीने त्यावरच बोलू लागले. पण, कल्पनाविश्वात, त्यातही जादुभरल्या दुनियेत रमायला लहान मुलांना आवडते. या आवडीला भाषेची, भौगोलीक सीमारेषेची मर्यादा नाही. पुढच्या भागात हॅरी काय करणार याबद्दल मुलांमध्ये चर्चा रंगू लागल्या. त्यामुळे हॅरी पॉटरच्या पुस्तकांवर उड्याही पडू लागल्या. बालवाङ्‌मयात यापूर्वी "नायक' होऊन गेले. त्यातील काही नायक तर साहित्यविश्वात अजरामरही झाले; पण तो काळ झटपट संपर्काचा, माहिती तंत्रज्ञानाचा, बाजारपेठेवर आधारेलेल्या अर्थव्यवस्थेचा आणि माध्यमांच्या स्फोटाचा नव्हता. त्यामुळे हॅरी पॉटरच्या पुस्तकांइतकी प्रसिद्धी (आणि पैसाही) त्यांच्या वाटेला आले नाही. यात हॅरी पॉटर किंवा रोलिंगबाईंचा काही दोष नाही. असलाच तर तो काळाचा आहे. - आणि अन्य

2 comments:

ruta said...

kalacha mahima chhan aahe. pratyek kalatalya balnaykala thodya far farkane ashich popularity milali. tya veli technology itaki advanced navati.. tarihi. ya sagalyatun ek prakarshane janavate, ki manus kuthalahi aso tyala swapna ranjanat, adbhut duniyet ramayla aavadata.
all the best bharatkumar.. by the way tumacha khara nav kay?

sunilSchavan said...

सुंदर लेख. मार्केटमध्ये ज्याची चलती आहे त्याला डोक्‍यावर घेण्याचे हे दिवस. मराठीतील बालकुमार साहित्य खरे तर मुलांच्या बुद्धीची सकसता वाढविणारे आहे. फास्टर फेणे, गोट्या, बोक्‍या सातबंडे एवढेच नव्हे तर मराठी लेखकांनी लिहिलेली गालिव्हरचा प्रवास, अरेबियन नाईटस कथा अतिशय उत्तम आहे. पण याची चर्चा पालकांनी केली तर त्यांना मागास विचारांचे मानले जाते. हॅरी पॉटरच्या का निमित्ताने होईना मुलांना वाचनाची गोडी लागतेय हे त्यातल्या त्यात चांगले लक्षण. पॉटरच्या किंमती मात्र खिसे साफ करणाऱ्या आहेत.
माझा मुलगा सहा वर्षांचा आहे. अर्थात तो इंग्रजी शाळेत शिकतो. मी घरात अद्यापही केबल घेतलेले नाही. मुलगा एक दिवस रडून तक्रार करीत आला, ""माझे पार्टनर चॅनलवरच्या स्टोरी सांगतात. माझ्याकडे दूरदर्शन आहे सांगितल्यावर सगळे हसले. आपण केबल पण घेऊ आणि डीव्हीडीही. भूक्कड दूरदर्शन मी पाहणार नाही.''
त्याला कसे समजून सांगावे हा प्रश्‍न पडला. केबल घ्यायचे नाही यावर आमचे नवरा-बायकोचं एकमत होतं. मग त्याला आम्ही समजावलं, ""बाळा, केबलवर कार्टून रोज असतात. दूरदर्शनवर शनिवारी. त्याने काय फरक पडतो? मित्रांना सांग माझे बाबा दर महिन्याला मला क्रॉसवर्ड ला नेतात. दोन पुस्तकं घेऊन देतात. मी बुद्धीबळ शिकलो. सूर्यनमस्कार शिकलो. हनुमानस्त्रोत्र शिकलो. चित्रकला शिकलो. पंतप्रधान कोण, राष्ट्रपती कोण, मुख्यमंत्री कोण हे मी सांगू शकतो. ओळखू शकतो. शिवाजीराजांच्या एक-एक किल्ल्याची हिस्ट्री मी दर महिन्याला ऐकतो आहे.... मित्रांना सांगण्यासाठी असा बराच खजाना आम्ही मुलाला दिला. (वरील यादीत खार्चिक बाब फक्त क्रॉसवर्डची. तीही महिन्याला शंभरेक रुपये) पुढच्या आठवड्यात स्वारी प्रचंड खूष. कारण त्याच्याकडे जे होतं ते बहुतेकांकडे नव्हतं म्हणून.
असो...मध्यमवर्गीयांचे लाईफ हे असे! "आता बोला...'वर असेच विषय येऊ द्यात.