Wednesday, October 24, 2007

तापमानवाढ आणि शांतता


देशाच्या प्रमुखपदासाठी लढविलेल्या निवडणुकीत निसटता पराभव पत्करल्यानंतर एखादा राजकारणी काय करेल?

बहुतेकांचे उत्तर असेल- ""पुढच्या निवडणुकीची तयारी करेल.''

आणि या उत्तरात चूक काहीच नाही; परंतु अल गोर यांनी ते चुकीचे ठरविले. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सन 2000 मध्ये त्यांनी लढविलेली निवडणूक चांगलीच गाजली. ते आणि जॉर्ज बुश यांची लोकप्रियता जवळजवळ सारखीच होती. फ्लोरिडा येथील मतांची फेरमोजणी करावी लागली आणि तेथे निकाल बुश यांच्या बाजूने झुकला. अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यानंतर गोर हे अमेरिकेच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर गेले आणि एका वेगळ्याच प्रश्‍नावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

हा प्रश्‍न आहे हवामान बदलाचा! भौतिक विकास साध्य करण्यासाठी मानव जे तंत्रज्ञान वापरत आहे, इंधनाचा अतिवापर करीत आहे, त्यामुळे प्रदूषण वाढतेय, कार्बन डाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढतेय आणि त्यामुळे पृथ्वी तापतेय. तापणारी ही पृथ्वी भविष्यकाळात रुद्रावतार धारण करणार आहे आणि त्याची प्रचिती आतापासूनच येऊ लागली आहे. तर, या तापणाऱ्या पृथ्वीकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी गोर साहेब पुढे आले. "वैश्‍विक तापमानवाढ'बद्दलच्या जनजागृतीसाठी सर्व प्रकारच्या माध्यमांचा वापर त्यांनी केला. भाषणे दिली, लेखन केले, पुस्तके लिहिली, ब्लॉग्ज लिहिले आणि "ऍन इनकन्व्हिनियंट ट्रूथ' सारखा ऑस्कर विजेता चित्रपटही काढला. त्यांच्या या "मिशन'ची दखल जगभर घेतली जाऊ लागली आणि नोबेल पारितोषिकानेही यंदा घेतली. "इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज' (आयपीसीसी- ज्याचे अध्यक्ष आहेत डॉ. राजेंद्र पचौरी) आणि गोर यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

वास्तविक "वैश्‍विक तापमानवाढ' हा विषय नवीन नाही. त्याची पहिली जाणीव शास्त्रज्ञांना 1896 मध्ये झाली होती. इंधन ज्वलनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आणि तापमानवाढीचा संबंध स्पष्ट करणारे गृहीतक 1957 मध्ये मांडण्यात आले. 1980 नंतर तापमानवाढीवर बोलले जाऊ लागले. 1992 मध्ये भरलेल्या वसुंधरा परिषदेत त्यावर चर्चा झाली होती- आणि तापमानवाढीस प्रगत देश जबाबदार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पाश्‍चिमात्य शास्त्रज्ञ एकीकडे तापमानवाढीविरुद्ध बोलत असताना तेथील सरकारांकडून मात्र पूरक पावले उचलली जात नव्हती. दुसरीकडे मात्र "तापमानवाढ ही आम्हाला प्रगतीपासून रोखण्यासाठी उठविण्यात आलेली आवई आहे. हा पाश्‍चिमात्यांचा डाव आहे,' असे मत भारतासारख्या विकसनशील देशांत व्यक्त होत होते. थोडक्‍यात, तापमानवाढीबद्दल म्हणावे तितके गांभीर्य नव्हते. मात्र, हळूहळू निसर्गाचा लहरीपणा वाढत गेला. कधी वादळांच्या रूपाने, कधी मुसळधार पावसाच्या तडाख्याने, तर कधी अवर्षणाने- जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हाहाकार होऊ लागला. हवामानातील हा बदल आणि तापमानवाढ यांचा परस्परसंबंध शास्त्रज्ञ उलगडून दाखवू लागले आणि मग या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यात येऊ लागले.

हे गांभीर्य ओळखणारे पहिले प्रमुख राजकारणी म्हणजे अल गोर. तापमानवाढ रोखण्यासाठी कार्बन डाय ऑक्‍साईड आणि अन्य हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करायला हवे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. सन 2000च्या निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी या विषयावर लक्ष केंद्रित केले असले, तरी 1970 पासून ते या विषयावर बोलत आहेत. अमेरिकी कॉंग्रेसचे सदस्य असताना सत्तर आणि ऐंशीच्या दशकात त्यांनी तापमानवाढीवर भाषण केले आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी सर्व प्रगत देशांनी करार करण्याचे ठरल्यानंतर "क्‍योटो करार' अस्तित्वात आला. प्रदूषणाला सर्वाधिक प्रमाणात कारणीभूत असलेल्या अमेरिकेने मात्र या करारावर सही करण्यास नकार दिला. गोर यांनी मात्र, अमेरिकेने हा करार स्वीकारावा, असा आग्रह धरला. क्‍योटो करारात सहभागी न होण्याचे सिनेटने ठरविले, त्या वेळी गोर यांनी विरोधात मतदान केले होते. त्याआधी पर्यावरणविषयक जागृतीसाठी त्यांनी "ग्लोब प्रोग्राम' जाहीर केला होता. शिक्षण, पर्यावरण, विज्ञान या विषयांत त्यांना पहिल्यापासूनच रस होता आणि राजकारणात राहूनही त्यांनी तो जोपासला.

तापमानवाढीचे राजकारण केले जाऊ नये, असे राजकारणी असूनही गोर म्हणत असतात. प्रत्यक्षात या विषयावर राजकारणच अधिक होताना दिसून येते. प्रदूषणाला सर्वाधिक प्रमाणात कारणीभूत असलेले प्रगत देश, भारत-चीन यांसारख्या विकसनशील देशांना प्रदूषण रोखण्याचे आवाहन करीत आहेत. तर, आमचा प्रगतीचा मार्ग आता कोठे सुरू झाला आहे, असे सांगत हे देशही वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढतच आहे. ते असेच वाढत राहिल्यास काय होऊ शकते, याची झलक "आयपीसीसी'ने यंदाच्या मार्चमध्ये अहवालाद्वारे जाहीर केले आहेच. त्यामुळे तापमानवाढीच्या प्रश्‍नाकडे- मानवी संस्कृतीला निर्माण झालेले आव्हान- या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. प्रदूषणाचा फटका सर्वांनाच बसतो आहे. तो कमी करायचा असेल, तर शाश्‍वत विकासाचा मार्ग निवडावा लागणार आहे, चंगळवाद कमी करावा लागणार आहे. गोर यांची अमेरिका चंगळवाद कमी करेल काय? अन्य प्रगत आणि विकसनशील देशही ही उपाययोजना करतील काय? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करता येतील. किंबहुना "आयपीसीसी'च्या अहवालानंतर ते जाहीरपणे मांडले जात आहेत. "जी-आठ' या प्रगत देशांच्या शिखर परिषदेतही या प्रश्‍नांची उजळणी झाली. प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, हरित तंत्रज्ञान, प्रदूषण पातळी, हवामान बदल... अशा अनेक संज्ञा सतत वापरण्यात आल्या; पण मूळ प्रश्‍न तसाच आहे. तो सुटावा म्हणूनच नोबेल समितीने यंदा गोर आणि "आयपीसीसी' यांना पारितोषिक जाहीर केले असावे. जगतात शांतता हवी असेल, तर निसर्गही शांतच हवा, नाही का?

1 comment:

Anonymous said...

America is main culprit for global Warming and he is not able to persue his own contry and countymen regarding this.