
घराणेशाहीला भारतात एक आगळे महत्त्व आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही आहे; परंतु कॉंग्रेसमधील घराणेशाही नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरली आहे. स्वतंत्र भारताच्या राजकारणातील आद्य घराणेशाही असल्यामुळे तसे होत असावे. किंवा या नेहरू-गांधी घराण्याकडे सर्वाधिक काळ देशाची सत्ता असल्याने होत असावे. आता राहुल गांधी यांच्या रुपात कॉंग्रेसने घराणेशाहीची परंपरा चालू ठेवण्याचे नक्की केले आहे. "कॉंग्रेस' आणि "गांधी' हे दोन "ब्रॅंडनेम' सोबत असल्याने राहुल गांधी यांचे निम्मे काम तर फत्ते झाले आहे. नेतृत्वाची थोडीशी चुणूक त्यांनी दाखविली, की त्यांचे भाट त्यांची यशोगाथा गाऊ लागतील आणि काही दिवसांतच त्यांची "लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा तयार केली जाईल.
(घराणेशाहीबरोबरच "भाटशाही' हे देखील आपल्या राजकाणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी... या सर्वांभोवती स्तुतिपाठकांचा गराडा पडलेलाच असायचा. किंवा आता सोनिया गांधींच्या भोवतीही भाटजन आहेतच. "इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा..' हे देवकांत बारूआ यांचे विधान प्रसिद्धच आहे. राजीव गांधींच्या काळात तर स्तुतिपाठकांनी कहरच केला होता. "किचन कॅबिनेट' म्हणून त्यांचा उल्लेख होत असे. आजकाल तर माध्यमांमध्येही स्तुतिपाठकांची भरती झालेली आहे. त्यामुळे त्या-त्या चरित्रनायकांचा नेहमी उदो-उदो चालू असतो!)
पण, घराणेशाही फक्त राजकारणातच नाही. ती सिनेमातही आहे. कपूर घराण्यातील चौथी पिढी रणबीर कपूरच्या रूपाने रुपेरी पडद्यावर झळकत आहे. नेहरू-गांधी घराण्यात जे स्थान तेच स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचे. रणबीर कपूरचा "सॉंवरिया' चित्रपट लवकरच झळकणार असल्याने त्याची प्रसिद्धी मोहीम सध्या जोरात राबविली जात आहे. याच चित्रपटातून अनिल कपूरची कन्या सोनमही पदार्पण करीत आहे. अमिताभचा मुलगा अभिषेक आता स्थिरावला आहे. धर्मेंद्रची मुले- सनी, बॉबी, अभय, इशा.. या सर्वांनी वडलांचा वारसा पुढे नेला. सनी खेरीज बाकीच्यांना एवढे यश लाभले नाही, हा भाग निराळा. संजय दत्त, काजोल, राणी मुखर्जी, करीना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान, सोहा अली खान, अजय देवगण, सलमान खान, विवेक ओबेराय, फरदीन खान, कुमार गौरव.. हे सारे (आणि आणखीही काही) आपापल्या घराण्याचा वारसा पुढे नेणारे आणि बऱ्यापैकी यश मिळविणारे. पुरू राजकपूर, किशन कुमार, रिया सेन यांसारखे काही वारसदार अपयशी ठरले. थोडक्यात हिंदी चित्रसृष्टीतील घराणेशाही आता तिसऱ्या-चौथ्या पिढीपर्यंत येऊन पोचली आहे.
क्रिकेटमध्येही घराणेशाही दिसून येईल. मात्र, चटकन नावे सांगता येणार नाहीत. मोहिंदर अमरनाथ (आणि त्याचा भाऊ सुरिंदर अमरनाथ), युवराजसिंग, संजय मांजरेकर.. ही नावे चटकन आठवतील. नबाब पतौडी आणि मन्सूर अली खान पतौडी या पतौडी खानदानाची तिसरी पिढी- सैफ अली खानच्या रुपाने क्रिकेटमध्ये येऊ शकली असती; परंतु सैफला क्रिकेट काही जमले नाही. त्यामुळे क्रिकेटचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले. (म्हणून तो चित्रपटात गेला. तिथे त्याला ऍक्टिंगही जमले नाही; पण त्यामुळे चित्रपटाचे दरवाजे बंद झाले नाहीत. हळूहळू सरावाने त्याला ऍक्टिंग जमू लागले!) सुनील गावस्कर विक्रमवीर. त्याचा मुलगा रोहन गावस्करही क्रिकेटपटू. पण, कसोटी क्रिकेटमध्ये त्याची डाळ शिजली नाही. त्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवरच मर्यादित राहिला. आधीच्या पिढीच्या अनेक दिग्गजांची मुले- तितकी प्रज्ञा नसल्याने- क्रिकेटमध्ये स्थिरावू शकली नाहीत.
याचाच अर्थ असा, की राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट यांमधील घराणेशाहीत एक मूलभूत फरक आहे. घरातील वातावरणामुळे पुढच्या पिढीला त्या-त्या क्षेत्रातील बाळकडू मिळणे स्वाभाविक आहे. प्रोत्साहन आणि संधीही मिळणे साहजिक आहे. पण, क्रिकेटसाठी तेवढेच पुरत नाही. तेथे प्रज्ञेला कष्टाची जोड असावी लागते. कामगिरी करून दाखवावी लागते. तरच राष्ट्रीय संघात स्थान मिळविता येते आणि मिळालेले टिकविता येते. क्रिकेटमध्ये आज वेगवेगळ्या राज्यांतील नवीन तरुण चेहरे दिसत आहे, त्याचे कारण हेच आहे. (भारतातील राजकारणात गुणात्मक फरक घडवायचा असेल, तर हाच निकष लावायला हवा.) गुणवत्ता आणि कामगिरी यांशिवाय क्रिकेटमध्ये पर्याय नाही.
हे दोन्ही गुण नसतानाही घराणेशाहीच्या जोरावर चित्रपटात काही काळ तग धरून राहता येते. आई-वडलांच्या जोरावर मिळणाऱ्या संधी, असंख्य वेळा "टेक' घेण्याच्या पद्धत, दिग्दर्शकाचे कौशल्य आणि प्रसिद्धी यांमुळे सुमार दर्जाचा कलाकारही पाय रोऊ शकतो. मात्र, त्यानंतरही त्याच्यात सुधारणा न झाल्यास त्याला घरचा रस्ता धरावा लागतो.
राजकारणात तर ही वेळ येतच नाही. येथे घराणेशाही हीच मुख्य पात्रता ठरते. विशिष्ट घराण्यात जन्म घेतल्याने राजकारणाचे, नेतृत्वगुणाचे, संघटनकौशल्याचे, निर्णयक्षमतेचे बाळकडू आपसूकच मिळत असते, अशी (स्तुतिपाठकांची) धारणा आहे. त्यामुळे प्रमुख नेत्याच्या पुढच्या पिढीचा सतत जयजयकार होत असतो. ही पिढी कितीही सुमार असली तरी फरक पडत नाही. या पिढीच्या नेतृत्वाचा कस लागला आणि तरीही पराभव आला, तर दोष कार्यकर्त्यांना दिला जातो. (आठवा उत्तर प्रदेश विधानसभेची अलीकडची निवडणूक.) आणि यश मिळाले, तर श्रेय नेतृत्वाला दिले जाते!
राजकारणात घराणेशाही टिकून आहे, ती यामुळेच."ट्वेंटी-ट्वेंटी' क्रिकेटचा विश्वकरंडक भारताने जिंकल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. देशात तो कमालीचा लोकप्रिय झाला आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेसने सूत्रे सुपूर्द केली. राहुल गांधी हे धोनीसारखी कामगिरी करतील काय, अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे; पणही तुलनाच चुकीची आहे. (त्याची कारणे वर स्पष्ट केली आहेत.) राहुल गांधी यशस्वीच होणार. आणि समजा अपयश आले, तरी तो त्यांचा दोष नसेल. दोष असेल, तो नतद्रष्ट कार्यकर्त्यांचा!