Monday, January 21, 2008

अभ्यास शिक्षक प्रशिक्षणाचा


"तारे जमीं पर'च्या निमित्ताने अध्ययनअक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दलची चर्चा सुरू आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा, अध्यापन विद्यालयांतील अभ्यासक्रमात तशी सोय करण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. वास्तविक या निमित्ताने शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा, "बीएड' आणि "डीएड' या अध्यापनविषयक अभ्यासक्रमाचा फेरविचार करण्याची आवश्‍यकता आहे.काळ झपाट्याने बदलतो आहे. नवे तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळे अध्यापनाची अनेक नवीन साधने उपलब्ध होत आहेत. शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात या साऱ्यांचा; तसेच भाषा, समाजशास्त्र, गणित, विज्ञान या विविध विद्याशाखांचा अभ्यासक्रमांत समप्रमाणात समावेश आहे काय, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. असा अभ्यास आपल्याकडे कधी होईल माहीत नाही; पण अमेरिकेत अशाच एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. ते भारतासाठीही उपयुक्त आहेत.
या अभ्यासाचा पहिला निष्कर्ष आहे ः "अमेरिकेतील शिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम संतुलित नाही. तो समाजशास्त्र विषयावर अधिक भर देणारा आहे. त्यामुळे गणित या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.' हा अभ्यास केला आहे, अर्कान्सस विद्यापीठातील शिक्षण सुधारणा विभागाचे प्रमुख जे. पी. ग्रीन आणि संशोधक कॅथरिन शॉक यांनी. अमेरिकेतील पहिल्या पन्नास अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांची पाहणी त्यांनी यानिमित्ताने केली. याशिवाय आणखीही 71 संस्थांच्या अभ्यासक्रमांचा मागोवा त्यांनी घेतला. या अभ्यासाच्या निष्कर्षावर आधारित एक टिपण ग्रीन यांनी अमेरिकेच्या "सिटी जर्नल'च्या ताज्या अंकात दिले आहे.
""शिक्षण हे सर्वंकष आणि संतुलित स्वरूपाचे असायला हवे. सामाजिक जडण-घडण, बहुसांस्कृतिकता यांबरोबरच विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकीही यायला हवी. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात समाजशास्त्राबरोबरच गणितालाही महत्त्वाचे स्थान द्यायला हवे. त्याबाबतची नेमकी स्थिती पाहण्यासाठी आम्ही हा अभ्यास केला,'' असे त्यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.
या प्रस्तावनेत नसलेला एक भाग म्हणजे, विद्यार्थ्यांच्या गणिताबद्दल अमेरिकेला वाटत असलेली चिंता. तेथील अनेक विद्यार्थ्यांना गणितात गती नसल्याचे आणि आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत ते मागे पडत असल्याचे निष्कर्ष यापूर्वी झालेल्या काही पाहण्यांतून पुढे आले आहेत. कुशल शिक्षकांचा अभाव आणि पाठांतरावर भर देणारा अभ्यासक्रम या दोन कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया कच्चा राहत असल्याचे तेथील टीकाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथील "नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स ऑफ मॅथेमॅटिक्‍स' या संघटनेने वर्षभरापूर्वी सरकारला अहवालही सादर केला होता.
या पार्श्‍वभूमीवर शिक्षक प्रशिक्षणाचा नवा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात बहुसांस्कृतिकता, विविधता, सर्वसमावेशकता आदी विषय किती प्रमाणात आहेत आणि त्या तुलनेत गणिताचे प्रमाण काय आहे, हे या अभ्यासात तपासण्यात आले. थोडक्‍यात अभ्यासक्रमातील बहुसांस्कृतिकता आणि गणित यांचे प्रमाण तपासण्यात आले. जर ते एकापेक्षा जास्त असेल, तर स्वाभाविकच गणिताकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते. अमेरिकेतील अध्यापक महाविद्यालयांतील याबाबतचे सरासरी प्रमाण होते- 1.82 म्हणजे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात गणितापेक्षा समाजशास्त्राला 82 टक्के झुकते माप दिले जाते. हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड या विख्यात विद्यापीठांत तर हे प्रमाण दोन आहे. मिसोरी, पेनसिल्व्हानिया या विद्यापीठांत हे प्रमाण उलटे आहे. म्हणजे तेथे गणिताला झुकते माप दिले जाते. मात्र, अशी विद्यापीठे कमी असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदविले आहे.
ही स्थिती बदलावयाची असेल, तर अनेक अडथळे असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. अध्यापन महाविद्यालयांतील प्राध्यापक हीच मुख्य अडचण आहे. बहुसांस्कृतिकता हा विषय अनेकांच्या आवडीचा असल्याने असे घडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर गणित हा विषय घेणाऱ्या (आणि शिक्षक होऊ पाहणाऱ्या) विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असल्याचे त्यांना आढळले आहे. मात्र, यामुळे गणिताकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. औद्योगिकीकरण झालेल्या तीस देशांतील विद्यार्थ्यांच्या गणिताच्या कौशल्याबाबत केलेल्या एका पाहणीत अमेरिकेचे स्थान 24 वे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आइसलॅंड, पोलंड; तसेच युरोप आणि आशियातील काही देशही अमेरिकेच्या पुढे आहेत, असे ग्रीन यांनी म्हटले आहे. म्हणूनच गणितावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
भारतात असा अभ्यास झालेला नाही; पण निष्कर्ष याहून वेगळा असेल, असे वाटत नाही. दहावीच्या परीक्षांचे निकाल याची साक्ष देणारे आहेत, नाही का?