Showing posts with label twenty-20 cricket. Show all posts
Showing posts with label twenty-20 cricket. Show all posts

Sunday, September 23, 2007

ओझे अपेक्षांचे


"ट्‌वेंटी-ट्‌वेंटी' या क्रिकेटच्या लघुत्तम आवृत्तीच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारुन भारतीय संघाने सर्वांनाच चकीत करून टाकले आहे. पाच-एक महिन्यांपूर्वी झालेल्या एक दिवसीय क्रिकेटच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच भारत गारद झाला होता. त्यामुळे आताच्या या स्पर्धेत भारत काही चमकदार कामगिरी करू शकेल, असे कोणालाच वाटत नव्हते. परिणामी या संघाकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. तो प्राथमिक फेरीत गारद झाला असता, तरी फारशी चुटपूट वाटली नसती. म्हणूनच प्रसार माध्यमांतही या स्पर्धेचा गाजावाजा नव्हता. क्रिकेटविषयक जाहिरातींचा भडिमार नव्हता. तसेच आपला संघ जिंकावा म्हणून देशभर प्रार्थना वगैरेही घडवून आणल्या गेल्या नव्हत्या. (घडवून हा शब्द जाणीवपूर्वक वापरला. कारण असे काही केले, की चटकन प्रसिद्धी मिळते, हे माहीत असल्याने अनेक जण मुद्दाम तसे करीत असतात.)

थोडक्‍यात या संघाकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. अपेक्षांचे ओझे नसल्यानेच हा संघ या स्पर्धेत अतिशय मोकळा-ढाकळा खेळ करीत राहिला आणि खेळाचा आनंद लुटत विजयीही होत गेला. भारतीय संघाच्या यशाचे अनेक प्रकारे विश्‍लेषण करता येईल. अनेक नवोदित; परंतु प्रतिभावंत खेळाडू या संघात होते, सचिन-सौरभ-राहूल ही ज्येष्ठ "त्रयी' संघात नव्हती यांसह अनेक कारणे दिली जात आहेत. परंतु, माझ्या मते कोणत्याही (अवास्तव) अपेक्षेविना "कोरी पाटी' घेऊन खेळण्याचाच घटक महत्त्वाचा आहे. खुद्द कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही ते कबूल केले आहे. आपल्याकडून अनेकांच्या अपेक्षा आल्या, की बाह्य तणाव वाढू लागतो आणि अनेकदा या ताणाखाली दबलो जातो. भारतीय क्रिकेट संघाचेही असेच होत होते. 20-20 क्रिकेट स्पर्धेत हा "बाह्य तणाव'च नाहीसा झाला. त्यामुळे संघ फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करू शकला. त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच अनुभवण्यास मिळाला.

मात्र, आता एक धोका संभवतो. तो म्हणजे हा संघ यशस्वी झाल्याने पुन्हा एकदा देशातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांचे ओझे (स्वतःचा "टीआरपी' वाढविण्यासाठी क्रिकेटचा "हाईप' करीत त्याला भरपूर प्रसिद्धी देणाऱ्या टीव्ही चॅनेल्समुळे) या संघावर येऊ शकतो!

* * *

भारतीय क्रिकेट संघाच्या ताज्या कामगिरीत एक संदेश दडला आहे. तो म्हणजे ः एखाद्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगू नका. त्यातून निराशाच हाती येईल. कारण अपेक्षाभंगाचे दुःख मोठे असते. दरवेळेस अपेक्षांची पूर्ती होतेच असे नाही. याचा अर्थ एखाद्याकडून अपेक्षा बाळगायचीच नाही का? जरूर बाळगायला हवी; पण ती अमानवी असता कामा नये. एखाद्याची प्रतिभा, कष्ट करण्याची तयारी, आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती, स्पर्धात्मकता, ताण सहन करण्याची क्षमता आदी अनेक घटक विचारात घेऊनच अपेक्षा करायला हवी. तसेच, अपेक्षांच्या पूर्तीसाठी पोषक वातावरणही निर्माण करायला हवी.

हा संदेश उपयुक्त ठरेल, तो देशातील कोट्यवधी आई-वडिलांना. शंभर कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात आशा-आकांक्षांवर जगणाऱ्यांचीच संख्या प्रचंड आहे. "आपल्याला जे जमलेले नाही तेआपल्या मुलांना जमावे, आपली स्वप्ने त्यांनी पूर्ण करावीत,' असे बहुतेक सर्व आई-वडिलांना वाटत असते. त्यांच्या साऱ्या आशा-आकांक्षा मुलांवरच असतात. थोडक्‍यात मुलांकडून त्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात. आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता सर्व मुलांमध्ये असतेच असे नाही. अनेकांना या अपेक्षांचे ओझे वाटू लागते आणि त्या ओझ्याखाली ते दबले जाऊ लागतात. परिणामी जे शक्‍य आहे तेही त्यांना अशक्‍य होते. अशा मुलांचे कोवळे वय होरपळून जाते. अनेकांचे मानसिक संतूलन ढळते. काहीजण टोकाची कृती करतात.

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालानंतर याचे प्रत्यंतर दरवर्षी येते. आपल्या मुलांची कुवत काय आहे, त्यांचा वैयक्तिक कल काय आहे हे त्यांनी पाहायला हवे. समजा एखाद्याला विज्ञानात गतीच नसेल, त्याऐवजी त्याचे मन साहित्य-कलेत रमत असेल, तर त्याच्याकडून इंजिनिअर होण्याची अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. त्याऐवजी त्याला हव्या त्या क्षेत्रात अभ्यास करण्याची संधी दिल्यास तो चमकदार कामगिरी करू शकतो. थोडक्‍यात "झेपेल इतके; परंतु ओझे होणार नाही' याची काळजी अपेक्षा बाळगता घेतली गेली पाहिजे.