Showing posts with label Ramayana. Show all posts
Showing posts with label Ramayana. Show all posts

Sunday, September 16, 2007

"सेतुसमुद्रम'चा वाद


माझ्या लहानपणीची एक आठवण. त्यावेळी सोलापुरात भर चौकात मारुतीचे मंदिर होते. मध्येच मंदिर असल्याने लोक त्या मारुतीला "मधला मारुती' म्हणायचे. पुढे रहदारी वाढली आणि वाहतुकीची कोंडी होऊ लागली. मधल्या मंदिराचाच मुख्य अडथळा होता. या चौकातील वाहतूक सुरळीत करायची असेल, तर मंदिर हटवावे लागेल, अशी भूमिका महापालिकेने घेतली. भाविकांचा अर्थातच विरोध; पण पालिकेने भूमिका कायम ठेवली आणि याच चौकात कोपऱ्यात नवीन मंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिले. प्रथम मंदिर बांधण्यात आले आणि मग आधीच्या मंदिरातील मारुतीचे नव्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. अशा रीतीने तेथील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा अडथळा बाजूला करण्यात आला.

हे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या गाजत असलेला "सेतुसमुद्रम' प्रकल्प. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान असलेल्या पाल्कच्या सामुद्रधुनीतून सागरी कालवा निर्माण करण्याचा हा प्रकल्प. मात्र, रामायणात उल्लेख असलेल्या "रामसेतू'ला यामुळे धक्का बसणार आहे. सीतेला सोडवण्यासाठी लंकेत जाण्याकरिता प्रभू रामचंद्रांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल बांधण्याता आल्याची गोष्ट आपल्याला माहीत आहेच. या पूलाच्या मागे कोट्यवधी हिंदूंच्या भावना निगडित आहेत. पूल तोडल्यास त्यांच्या भावना दुखावतील, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटना घेत आहेत. त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असतानाच, "" या पुलाला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याची'' भूमिका केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रकाद्वारे न्यायालयात घेतली. त्याहून कडी म्हणजे ""राम आणि रामायणाबाबात पुरावे नाहीत,'' असे सांगण्यात आले. देशभर प्रक्षोभ उसळल्यानंतर सरकारने प्रतिज्ञापत्रक मागे घेतले; पण यावरून निर्माण झालेला वाद अद्याप संपलेला नाही.

रामायण आपणा सर्वांनाच प्रिय असलेला विषय. रामायण आणि महाभारतातील गोष्टी ऐकतच आपण सारे लहानाचे मोठे झालो आहोत. ही दोन महाकाव्ये "अभिजात साहित्यकृती' आहेतच; पण त्यांचे स्थान त्याही पलीकडे आहे. कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात त्यांना स्थान आहे. या महाकाव्यांतील गोष्टी पुराणातील जरूर आहेत; परंतु मनुष्य स्वभावाचे बारकावे, जीवनातील संघर्ष, तत्त्वज्ञान या साऱ्यांमुळे त्या "कालातीत' आहेत. आजच्या एकविसाव्या शतकातही चपखल बसू शकेल, असे अनेक संदर्भ या महाकाव्यांत मिळतात. म्हणूनच ते केवळ "धार्मिक ग्रंथ' नाहीत. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि वेगवेगळ्या प्रसंगांत कसे वागावे याचे मार्गदर्शन करणारे ते ग्रंथ आहेत. साहित्यात प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब पडते. हे अनुभव जितके सच्चे, जितके वास्तव तितके साहित्य अव्वल दर्जाचे ठरते. या प्रकारच्या साहित्याला काळाची मर्यादा नसते. एक प्रकारे ते "अक्षर' म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही, असे वाङ्‌मय असते. रामायण आणि महाभारत ही अशी "अक्षर वाङ्‌मये' आहेत. त्यामुळेच "राम आणि रामायण यांच्याबाबत पुरावा देता येत नाही,' असे म्हणणे धाडसाचे ठरते. राम आणि रामायणाला ऐतिहासिक आधार नाही, हे म्हणणे म्हणूनच तपासले पाहिजे.

मात्र, प्रतिज्ञापत्रकातील हे वाद्‌ग्रस्त विधान सरकारने मागे घेतले आहे. आता जे होत आहे, ते सत्तेसाठीचे राजकारण आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी भावना भडकावण्याचे काम केले जात आहे. यामुळे मूळ सेतूसमुद्रम प्रकल्पाचा हेतू मागे राहिला आहे. वास्तविक भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान अशा प्रकारचा प्रकल्प राबविता येऊ शकेल, याची जाणीव दीडशे वर्षांपूर्वी ए. डी. टेलर या ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याला झाली होती. पुढे स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये केंद्र सरकारने एक समिती नेमली होती. मात्र, काहीही झाले नाही. अखेर 2000-01 च्या अर्थसंकल्पात सुमारे साडेचार कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली. या प्रकल्पाला आज विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कालावधीतच तो मंजूर करण्यात आला. या प्रकल्पामुळे भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांदरम्यानच्या वाहतुकीसाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कारण सध्याचा मार्ग हा श्रीलंकेला वळसा घालणारा आहे. हा कालवा झाल्यास 424 नॉटिकल मैल म्हणजे 780 किलेमीटर अंतर कमी होणार आहे. त्यामुळे तीस तासांचा वेळ आणि अर्थातच इंधन आणि पैसा यांची बचत होणार आहे. शिवाय सागरी व्यापार वाढणार आहे. थोडक्‍यात हा एक व्यवहार्य आणि उपयुक्त प्रकल्प आहे. केवळ "रामसेतू'ला धक्का बसतो म्हणून त्याला विरोध करणे अव्यवहार्य ठरते. "रामसेतू'ला धक्का बसल्याने भाविकांच्या भावनांना तडा जाईल, असे म्हटले जाते; परंतु त्यांच्या भावना इतक्‍या तकलादू नक्कीच नाहीत. "मधला मारुती' हलविल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. भाविकांचा विरोध क्षणिक होता; पण व्यवहार्य तोडगा काढल्यावर तो मावळला. या प्रकल्पाच्या बाबतीतही असे करता येईल. या प्रकल्पावर पर्यावरणाच्या दृष्टीनेही आक्षेप घेतले जात आहेत. विशेषतः तेथील सागरी जीवसृष्टीवर विपरित परिणाम होईल, असे म्हटले जाते. या साऱ्यांचा अभ्यास करून मार्ग नक्कीच काढता येईल; पण त्यासाठी प्रकल्पच नको, अशी भूमिका घेणे हे बुरसटलेल्या विचारांचे लक्षण आहे. पुराणावर श्रद्धा जरूर हवी; पण आपले विचार पुरोगामी आणि विकासाभिमुखच हवेत.